पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/१८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

किल्यावर आपले कायमचें निशाण फडकत ठेवून आपणास 'राजा' असें म्हणवूं लागला. वाचकहो, रणजितसिंगाचें वरील कृत्य त्यावेळी लहानसान कृत्यांपैकीं नन्हते; कारण केवळ आपली अंगची कर्तबगारी, चपलता व मर्दुमकी इत्यादि अनेक गुणांच्या योगानें श्री शिवाजी महाराजांनी अल्प वयांत म्हणजे आपल्या वयाच्या १९ व्या वर्षी विजापूरकरांच्या अमलांत असलेल्या महाराष्ट्रांतील तोरणा किल्यावर जसा आपला कीर्तिध्वज प्रथम उभारिला तद्वतच पंजाबप्रांतीं लाहोरच्या किल्ल्यावर आमच्या पंजाबी सिंहानें आपले निशाण सो १९ वर्षांचा असतांच फडकाविलें ही आम्हीं आर्यानी मोठ्या अभिमानाची गोष्ट समजली पाहिजे. असो. रणजित्- सिंगानें याप्रमाणे स्वदेशहिताचे काम आपल्या शिरावर घेण्यास आरंभ केला खरा; पण तें त्या वेळच्या त्या प्रांतां- तील कित्येक शीख राजांस सहन झाले नाहीं. कारण रण- जितसिंगाचा बाप महानसिंग याच्या कारकीर्दीपासून जी द्वेषबुद्धि किंवा मत्सर त्या लोकांत पसरला होता त्यास रण- जितसिंगाच्या वरील कृत्यामुळे अधिक बळकटी येत चालली. मुख्यत्वेकरून भांगी मिसलीचे मुख्य सरदार, साहेबसिंग व गुलाबसिंग यांनीं रणजितसिंगापासून लाहोर शहर घेण्याचें मनांत आणून त्याकरितां त्यांनीं रामगढिया मिसलीचा मुरूप जो प्रसिद्ध 'जस्सासिंग' त्यास कांहीं आश्वासने देऊन आपल्या कटांत सामील करून घेतलें, आणि रणजितसिंगा- विरूद्ध त्या त्रिवर्गांनीं एकसमयावच्छेदेकरून एक नवीन बनाव घडवून आणिला. त्यांनीं आपसांत असें ठरविलें कीं, 'बसन' येथे दरबार भरवून त्या दरबारास येण्याविषयीं रणजितसिंगास आमंत्रण पाठवावें, आणि तो तेथें आल्यावर