पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २५ )

असे नमूद केलें होतें:-"कंपनीसरकाराने सतलज नदीच्या उत्तरेकडील प्रदेशांत व त्यांतील रहिवाशांच्या हितसंबंधांत बिलकुल हात घालू नये, व त्याप्रमाणेच त्या नदीच्या दक्षिणेकडील प्रांतावर व त्यांतील रजवाड्यांवर आम्ही आपलें वर्चस्व न सांगतां त्यांजकडून खंडणीच्या रूपानें अथवा दुसऱ्या कोणत्याही प्रकाराने वसूल किंवा कर घेणार नाहीं. "हा तहनामा गव्हरनर जनरलानें पाहून पसंत केला आणि त्यावर तारीख ३० माहे मे रोजी आपली सही केली. असो. ह्याप्रमार्णे रणजितसिंगानें कंपनी सरकारची समजूत करून व सिस्सतलज प्रांतांत ढवळाढवळ करण्याचें सोडून देऊन आपण त्या सरकारचा कायमचा दोस्त होऊन राहिला. नंतर त्यानें आपले लक्ष अनुक्रमें मुलतान, काश्मीर व पेशा-वर वगैरे प्रांत घेण्याकडे लावून तो आपला फौजफांटा जय्यत ठेवण्याच्या तयारीस लागला.