पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/४३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३८ )
भाग ५

रणजितसिंगाचे आपल्या फौजेची सुधारणा करण्याकडे लक्ष त्याकरितां कंपनी सरकारास व फ्रेंचसरकारास त्याची विनंती - परद्वीपस्थ जनरल आलार्ड वगैरेचें आगमन त्यांचा दरबारति प्रवेश - दरबारच्या जमाबंदीची पद्धत - निरनिराळे कर व कामदार - वगैरे.  मागील भागांत सांगितल्याप्रमाणें रणजितसिंगानें पंजाब- प्रांत व त्याच्या उत्तरेकडील बहुतेक डोंगरी प्रदेश, तसेंच काश्मीर, मुलतान, पेशावर वगैरे प्रांतही आपल्या तरवारीच्या जोरावर एकामागून एक काबीज करून आपल्या राज्याची सरहद्द अफगाणिस्थानांतील काबूलनदीपर्यंत कायम केली; परंतु ह्या एकंदर भानगडींत त्याच्याजवळ जें सैन्य होतें तें इंग्रजी सैन्याप्रमाणे कवाईत शिकलेले नसल्यामुळे युसफजाई, चरकजाई व काबुली पठाण लोकांस जिंकण्यास त्यास फार त्रास व खर्च सोसावा लागला; म्हणून ह्यापुढें तरी आपलें सैन्य चांगले तयार होऊन युद्धकलेत निपुण व्हावें ह्याकडे त्याचें लक्ष लागले. त्याने प्रथमतः आपल्या दोस्ताकडे म्हणजे कंपनीसरकाराकडे कांहीं लष्करी अमलदार आपल्या लष्करास कवाईत शिकविण्याकरितां मिळावेत म्हणून मागणें केले; परंतु त्या सरकारानें त्याची विनंति मान्य केली नाहीं. तेव्हां त्याने त्यावेळीं हिंदुस्तानांत असलेल्या दुसऱ्या परद्वीपस्थ सरकाराकडे म्हणजे फ्रेंचसरकाराकडे तसेच मागणें केलें. इतक्यांत दैववशात् असें घडून आलें कीं, जनरल व्हेंट्रा प्रमाणेच जनरल ' आलाई ' ह्या नांवाचा एक इतालियन् सरदार जगद्विख्यात् नेपोलियन बोनापार्टाची नोकरी सोडून उदरंभरणार्थ आशिया खंडांत