पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वर्षे लोटल्यावर प्रसिद्धीस येऊन त्यानें स्वपराक्रमानें त्या भागांतील लोकांस थक्क करून सोडिलें, त्याचें कथानक होय. अशा पुरुषाचें महाराष्ट्रमार्धेत अल्पस्वल्प तरी चरित्र असून ते आबालवृद्धांच्या नजरेखालून जावे अशी उत्कटेच्छा माझ्या मनांत बिंबल्यापासून मीं प्रस्तुत यत्न करण्याचे धाडस केले; परंतु ग्रंथलेखनासारखें अति जोखमाचें काम प्रथमतःच आपल्या शिरावर घेतल्यामुळे ते मला कितपत साधलें आहे याची शंका आहे. दुसरे असे कीं, अशा प्रकारच्या ग्रंथ- रचनेस साग्र व खरी माहिती मिळण्याकरितां द्रव्यबलाचें विशेष साधन लागतें, आणि त्याचा तर मजजवळ पुष्कळच अभाव आहे; तथापि मुलतान, लाहोर व अमृतसर इत्यादि ठिकाणांहून कांहीं विश्वसनीय अशी माहिती मिळवून विशेषतः सरलिपेल ग्रिफीन् या इंग्रज मुत्सद्यानें व ग्रंथकारानें केलेले " पंजाबांतील राजे व सरदार " वगैरे ग्रंथांवर भरवसा ठेवून त्यांच्या आधारानें हें चरित्र लिहिले आहे, व त्याबद्दल सर साहेबांचा मी फारच आभारी आहे. शेवटीं माझी अशी प्रार्थना आहे कीं, हा चरित्ररूपी लेख केवळ माझा 'ओ ना मा' असून तो मी आपल्या विद्वान् मित्रांपुढे ठेवीत आहे; म्हणून त्यांनी हे पुस्तक समग्र वाचून त्यांतील दोष व इतर जास्त माहिती मजवर कृपा करून कळविल्यास मी त्याप्रमाणे सुधारणा करीन असे म्हणून हा प्रस्तावना लेख येथें पुरा करितों. श्रीवर्धन, संस्थान जंजिरा. मित्ति चैत्र शुद्ध ० १ शके १८२६. पुस्तक कर्त्ता, मि० अ० म०.