पान:महाराज रणजितसिंह यांचे चरित्र.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३ )

मारून त्यास अगदी जर्जर करून सोडिलें व शेवटीं त्यास त्या प्रांतांतून हांकूनही लाविलें; नंतर पुढे कांही दिवसांनीं चरत्सिंग आजारी पडल्यामुळे लढाईसारखी मोठ्या हिमतीचीं कामे त्याच्या हातून होतनाशीं झालीं व तो अगदीं थकून गेला होता म्हणून त्याची जहागीर 'गुजरानवाला' येथे होती तेथें आयुष्याचे दिवस घालवावे या हेतूनें तो जाऊन राहिला; परंतु थोडक्या दिवसांनीं तेथें त्याचा अंत झाल्यावर त्याचा पुत्र वरील महानसिंग हा आपली जहागीर पाहूं लागला. त्यासमयीं त्याचें वय अवघें ११ वर्षीचें होतें; तथापि त्यानें आपले मित्र व नातलग यांच्या साहायानें आपली जहागीर संभाळून लाहोर येथें त्यावेळीं उत्पन्न झालेलीं लहानसान बंड मोडून टाकिली. इ. स. १७७४ त 'झींद ' येथील राजा 'गजपतसिंग' याच्या 'राजकुवर नामक कन्येबरोबर त्याचे लग्न झालें. हा लग्नसमारंभ मोठ्या थाटाचा झाला; तथापि तो सिद्धीस जाईपर्यंत त्यांत अनेक तंटेबखेडे उत्पन्न झाले होते. त्यांचा परिणाम शेवटीं असा झाला कीं, गजपतसिंगार्ने 'नामा ' येथील 'इमीरसिंग राजास कैद करून त्याच्या प्रांतावर स्वारी केली आणि त्याचा बहुतेक भाग आपण बळकावून बसला.
 महानसिंग फार लोभी व कपटी होता. त्यानें 'जम्मू ' प्रांत बळकाविण्याकरितां अनेक युक्त्या योजिल्या होत्या; त्यांपैकी शेवटची युक्ति अशी होती कीं, इ. स. १७८० त तेथील राजा मरण पावून त्याच्या पश्चात् त्याच्या गादीवर 'ब्रिजलालदेव' हा बसला. ब्रिजलालदेवास, भांगी सरदारांनीं त्याचा कांही मुलूख बळकाविला होता म्हणून, त्यांचें पारिपत्त्य करावयाचें होतें; याकरितां त्यानें आपल्या मदतीस महानसिं-