पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/११

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पडदा पद्धत

 परदेश प्रवासावेळी महाराज आपल्यासोबत चिमणाबाईंनाही घेऊन जात. परदेश प्रवास करताना महाराणी चिमणाबाई पडदा पद्धतीचा अवलंब करत नव्हत्या. पाश्चिमात्य स्त्री इतक्याच मोकळेपणाने त्या परदेशात वावरत. स्त्रियांबद्दलच्या पारंपरिक धारणा आणि कल्पना दृढमूल असणाऱ्या काळात महाराणी चिमणाबाईंनी पडदा पद्धतीचा त्याग केला. १९१४ पासून भारतातही चिमणाबाईंनी पडदा पद्धतीचा त्याग केला. पडदा पद्धतीचा त्याग करणाऱ्या राजघराण्यातील चिमणाबाई या पहिल्या महिला होत्या.

संस्थात्मक कार्य

 महाराजांबरोबर वेळोवेळी भारताबरोबरच युरोप, अमेरिकेसारख्या पाश्चात्य आणि जपानसारख्या पौर्वात्य देशांमध्ये केलेल्या प्रवासात महाराणी चिमणाबाईंना पाश्चात्य स्त्रियांनी उभारलेल्या संस्थांचे अवलोकन करता आले. भारतीय स्त्रियांच्या उन्नतीसाठी स्त्रियांना शिक्षण देतानाच त्यांच्या कौशल्यांना वाव देणाऱ्या विविध संस्थांची उभारणी करणे आवश्यक असल्याचे चिमणाबाईंचे मत होते. परदेशातील चांगल्या गोष्टींचे 'अनुकरण करत असतानाच महाराजा सयाजीरावांनी बडोद्यात उभारलेल्या विविध संस्था आणि राबवलेल्या योजनांचा आदर्शही चिमणाबाईंसमोर होता. या आदर्शाचे अनुकरण करत महाराणी चिमणाबाईंनी अनेक संस्था निर्माण करून स्त्रीउद्धाराच्या कार्याला गती दिली.

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / ११