पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराणी चिमणाबाई लेडीज क्लब (१९०३)

 स्त्रियांचा सामाजिक संपर्क वाढावा यासाठी ३ मार्च १९०३ रोजी 'चिमणाबाई लेडीज क्लब'ची स्थापना करण्यात आली. भारतीय महिलेने स्थापन केलेला भारतातील हा बहुधा पहिला क्लब होता. फेब्रुवारी १९२६ मध्ये लेडीज क्लबने संगीत व नाट्य या कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या क्लबच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील बुद्धिमान स्त्रियांमध्ये होणारा परस्पर संवाद हा बडोद्यातील स्त्रीशिक्षणाच्या प्रगतीचा महत्त्वाचा टप्पा होता.

श्री चिमणाबाई स्त्री उद्योगालय (१९९७)

 स्त्रियांना स्वावलंबी करून त्यांचा व्यावसायिक दृष्टिकोन व्यापक करण्यासाठी १९१७ मध्ये 'स्त्री उद्योगालया'ची स्थापना करण्यात आली. या उद्योगालयाने महिलांविषयीचे विविध उद्योग आणि तांत्रिक शिक्षणाच्या विविध अभ्यासक्रमाची सोय करून दिली. स्त्री उद्योगालयाने भारतातील स्त्रियांचा पहिला आनंदमेळा भरविला होता. महिलांना व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देणाऱ्या गुजरातमधील या पहिल्या केंद्रात शिवणकाम, भरतकाम, विणकाम, लेस तयार करणे असे कौशल्याधारित प्रशिक्षण दिले जात असे. तसेच मसाले, मुरांबे, लोणची, फराळाचे पदार्थ स्त्रियांकडून तयार करून घेतले जात होते.

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / १२