पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आली. या संस्थेतर्फे नर्सिंग, प्राथमिक उपचार, शिवणकाम, भरतकाम, चित्रकला, टंकलेखन यांचे प्रशिक्षण दिले जात असे.

कन्या आरोग्य मंदिर (१९१५)

 १९१५ साली श्री. मनोरमा दिघे यांच्या प्रेरणेतून जुम्मादादा व्यायाम मंदिरात या संस्थेची स्थापना झाली. मनोरमा दिघे यांनी खास स्त्रियांसाठी असलेले शारीरिक शिक्षणाचे परीक्षण त्यांचे पती शंकरराव दिघे यांच्याकडून घेतले. मुलींचे आरोग्य चांगले राहावे, स्वतःचे स्वरक्षण करण्याबाबत त्या सक्षम असल्या पाहिजेत. त्या स्वावलंबी असाव्यात या एकमेव ध्येयाने मुलींना शारीरिक शिक्षण देणे आवश्यक आहे. हाच ध्यास घेऊन ही संस्था निर्माण केली होती. यामध्ये मुलींना वेगवेगळे खेळ, कसरतीचे प्रकार, कवायत शिकविली जात असत. विशेष म्हणजे मनोरमा दिघे यांची मुलगी वसुमती ही ३०० मुली असलेल्या या संस्थेची व्यवस्था पाहण्याचे काम करत होती.

मुलींचे महाराणी हायस्कूल (१९०७)

 राज्यातील एक सर्वोत्तम शाळा म्हणून या शाळेचा लौकिक होता. १९२५-२६ साली या शाळेचे स्वतः चे वसतिगृह होते. १९३२- ३३ साली या वसतिगृहात ७६ विद्यार्थिनी राहत होत्या. सर्वसामान्य विषयांबरोबर विणकाम, संगीत, चित्रकाम, पाकशास्त्र, गृहशास्त्र, भरतकाम याचबरोबर माळीकाम याही विषयाचा यात अंतर्भाव होता. शास्त्रोक्त पद्धतीने रोपे कशी वाढवावी याचे प्रशिक्षण येथे

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / १४