पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/१५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिले जात होते. इस्त्री कशी करावी याचे प्रशिक्षण देण्यासाठी शाळेत धोबी नेमला होता. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस्, बॉम्बे या संस्थेतील प्रवेश परीक्षेची तयारी येथे करून घेतली जात होती. हे सर्व उपक्रम आजही नावीन्यपूर्ण वाटतात. यातून सयाजीराव महाराजांच्या व्यापक दूरदृष्टीचा प्रत्यय येतो. या सर्व उपक्रमांचे नेतृत्व महाराणी चिमणाबाई करत होत्या.

भगिनी समाज (१९२१)

 महाराणी हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती झवेरी यांनी ८ एप्रिल १९२१ रोजी भगिनी समाजाची स्थापना केली. महाराणी हायस्कूलच्या जागेत दर शनिवारी स्त्रियांनी एकत्र येऊन बैठका घेण्यास सुरुवात केली. या संस्थेच्या वार्षिक समारंभात कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन, निबंध स्पर्धा, देशी खेळ, गायन स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. श्रीमंत लक्ष्मीबाई मुजूमदार या स्त्रियांकडून मराठी गरब्याचा सराव करून घेत असत व रिकाम्या वेळेत आपल्या रावपुरा येथील मुजूमदार वाड्यातील खासगी तलावात स्वतः स्त्रियांना पोहायला शिकवत. १९२७ साली बडोद्यात जेव्हा पुराने मोठी हानी झाली तेव्हा भगिनी समाजाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी मोठी रक्कम जमा करून पूरग्रस्त गरिबांच्या घरोघरी जाऊन मदत पोहोचवली होती.

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / १५