पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दृष्टिकोनाची प्रशंसा करताना म्हटले की, 'पहिल्या अखिल भारतीय महिला परिषदेच्या अध्यक्षा बडोद्याच्या महाराणी चिमणाबाई गायकवाड या होत्या. त्यांनी आणि महाराजांनी त्यांच्या राज्यात स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला व त्यातही स्त्रियांचे लग्नाचे वय वाढवून यासंबंधी कायदेशीर सुधारणा सर्वात लवकर व वेगाने केल्या. या त्यांच्या कार्यामुळे त्यांची अध्यक्षपदासाठी निवड करण्यात आली. त्यांचे पती महाराजा सयाजीराव हे सुधारणावादी राज्यकर्ते होते आणि महाराणी त्यांना सर्वतोपरी योग्य अशा साथीदार होत्या. पडदा पद्धतीचा त्याग करणाऱ्या राजघराण्यातील पहिल्या महिला होत्या. स्वयंप्रेरणेने जगणाऱ्या महाराणीचे व्यक्तिमत्त्व अतिशय प्रभावशाली आहे.'

 १९२९ मध्ये विठ्ठल रामजी शिंदे यांचे 'तौलनिक भाषाशास्त्र' या विषयावरील भाषण बडोद्यातील सहविचारिणी सभेने आयोजित केले होते. या भाषणाचा वृत्तांत वर्तमानपत्रात वाचून महाराणी चिमणाबाईंनी विठ्ठल रामजी शिंदे यांना चर्चेसाठी बोलावले. यावेळी चिमणाबाईंनी रशियातील कम्युनिझम या विषयावर आपल्याशी चर्चा केल्याचा संदर्भ शिंदे यांनी त्यांच्या 'माझ्या आठवणी व अनुभव' या आत्मचरित्रात नोंदवला आहे. ज्या काळात भारतात कम्युनिझम हा विषय नुकताच चर्चे आला होता त्या काळात एक मराठी राणी कम्युनिझमसारख्या गंभीर विषयांत रुची ठेवते यातच महाराणी चिमणाबाई यांचे बौद्धिक क्षेत्रातील अनन्य स्थान स्पष्ट होते.

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / २५