पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराणी चिमणाबाई
सयाजीराव गायकवाड

 एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध आणि विसाव्या शतकाचा पूर्वार्ध अशा जवळजवळ शतकाचा कालखंड हा स्त्री सुधारणा आणि स्त्री संघटन या दोन्ही दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. प्राचीन काळापासून स्त्रियांना समाजात दुय्यम स्थान होते, पण १९ व्या शतकात स्त्रियांची गुलामगिरीतून मुक्तता करून उन्नती घडवून आणण्याविषयी जागृती झाल्याचे दिसते. १८४८ मध्ये पुण्यात भिडे वाड्यात महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्त्रियांची पहिली शाळा सुरू करून स्त्रियांना शिक्षणाची दारे खुली केली. १९ व्या शतकात १८५० नंतरच्या उत्तरार्धात शिक्षणाच्या बरोबरीने स्त्रियांना सामाजिक, सांस्कृतिक जीवनात सहभागी करून घेण्याची तत्कालीन समाजसुधारकांची विलक्षण धडपड होती. स्त्रियांसंदर्भात सामाजिक काम करणाऱ्या स्त्रियांची पहिली पिढी यातून पुढे आली. सावित्रीबाईंनी यादृष्टीने पहिले पाऊल टाकले. महात्मा फुले यांच्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाईंनी

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / ६