पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विवाह, शिक्षण आणि वैचारिक जडणघडण

 सयाजीराव महाराजांच्या पहिल्या पत्नी महाराणी चिमणाबाईंचा ७ मे १८८५ रोजी मृत्यू झाला. त्यामुळे इंदोरजवळील देवास येथील बाजीराव अमृतराव ऊर्फ मामासाहेब घाडगे यांच्या पाचव्या कन्या गजराबाई यांच्याशी महाराजांचा दुसरा विवाह ठरला. गजराबाईंचा जन्म परंपरावादी कुटुंबात १६ नोव्हेंबर १८७१ रोजी झाला. वयाच्या १४ व्या वर्षी गजराबाईंचा (दुसऱ्या महाराणी चिमणाबाई) महाराजांशी २८ डिसेंबर १८८५ रोजी विवाह झाला. या महाराणीचे आधीचे नाव बदलून 'चिमणाबाई दुसऱ्या' असे नामकरण करण्यात आले. लग्नावेळी निरक्षर असणाऱ्या चिमणाबाईंच्या व्यक्तिमत्त्वामध्ये अमूलाग्र बदल घडवून आणण्यात महाराजांचा सर्वाधिक वाटा होता. विवाहानंतर चिमणाबाईंनी घेतलेल्या शिक्षणामागे सयाजीराव महाराजांची प्रेरणा होती. परंपरावादी कुटुंबात वाढलेल्या चिमणाबाई विवाहानंतर आधुनिक जीवनप्रणालीचा स्वीकार करण्यास सुरुवातीला तयार नव्हत्या. परंतु महाराजांमुळे शक्य झालेले युरोपियन देशांचे दौरे व पाश्चात्य राजघराण्यातील जोडप्यांशी झालेले वैचारिक आदान-प्रदानामुळे चिमणाबाईंना स्त्रीशिक्षणाचे महत्त्व पटले.

 १८८१ साली महाराजांनी राज्यकारभाराची सूत्रे हाती घेतली. तेव्हाच आपल्या राज्याचे सुधारलेल्या आणि पुढारलेल्या राज्यात परिवर्तन करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ केला. स्त्री शिक्षणाला आरंभ

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / ८