पान:महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केला. सयाजीरावांनी महाराणींनाही शिक्षण देण्याचा निश्चय केला. सुरुवातीला महाराणींना शिकवण्यासाठी सगुणाबाई देव, नंदाबाई पितळे या दोन शिक्षिका होत्या. परंतु महाराणींच्या शिक्षणात फारशी प्रगती होत नसल्याने महाराजांनी १८९६ साली Miss Vivaseur या युरोपियन शिक्षिकेची प्रथम नियुक्ती केली. तेव्हापासून काही युरोपियन शिक्षिका महाराणींजवळ नोकरीत होत्या. मिस सोराबजी, मिस मिड, मिस जेफर्सेस, मिस मॅक्कीन, मिस टोटनहॅम या शिक्षिका आणि सोबतकार महाराजांनी चिमणाबाईंना उपलब्ध करून दिल्या. परिणामी महाराणींच्या व्यक्तिमत्त्वात अपेक्षित बदल घडून आले. महाराणी चिमणाबाई अतिशय जिद्दी आणि कष्टाळू विद्यार्थिनी होत्या. त्यामुळे त्या अल्पावधीतच मराठी, संस्कृत, इंग्रजी व गुजराती शिकल्या. त्यांनी युरोपातील अनेक चांगल्या चालीरीतींचे अनुकरण केले. युरोपियन शिक्षिकेच्या प्रयत्नाने व स्वतःच्या इच्छाशक्तीने त्यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात क्रांतिकारक बदल घडवून आणला.

आरोग्य आणि क्रीडा

 स्त्रियांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी त्यांनी आपल्या शारीरिक विकासाकडे लक्ष देणे आवश्यक आहे याबाबत महाराजांप्रमाणेच त्या आग्रही होत्या. स्वतःच्या शारीरिक तंदुरुस्तीसाठी चिमणाबाई रोज ७५ मिनिटे चालण्याबरोबरच घोडेस्वारीसुद्धा करत. टेबल टेनिसची आवड असल्याने चिमणाबाई रोज संध्याकाळी टेनिसचे ४ सेट खेळत. चिमणाबाईंबरोबर टेनिस खेळताना बडोदा

महाराणी चिमणाबाई सयाजीराव गायकवाड / ९