पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/114

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भीती आणि भिंतींमधील बंदिस्त बाल्य


 संजय हळदीकर! कोल्हापूरच्या साच्या नाट्य उपक्रमांचे केंद्र. मराठी-हिंदी अशी तब्बल तीस नाटकं अभिनित, दिग्दर्शित करणारे हळदीकर सतत मुलांतरुणांत रमत आहेत. त्यांच्या दृष्टीने नाटक ही एक चळवळ आहे, हे खेळ आहे. खेळात सातत्य असलं, की सरावानं सराईतपण येतं. तसं ते अभिनयात, दिग्दर्शनात सराईत. चित्रपटाच्या कलात्मकतेतही त्यांची गती आहे. हळदीकर सगळ्यात असून नामानिराळे कसे राहतात, हा नेहमीच माझ्या कुतुहलाचा विषय होऊन राहिला आहे. अलीकडे वर्ष-दोन वर्षं ते मुला-तरुणींमध्ये मला सतत वावरताना दिसतात (रमतात म्हणणं ही औपचारिक गोष्ट झाली.) आणि विशेषत: अशा मुलांत की समाजाचं ज्यांच्याशी फार देणं-घेणं नाही. ती आहेत वंचित मुलंमुली. ती अनाथगृह, बालगृह, आश्रमशाळा, रिमांड होम बालकल्याण संकुलासारख्या बाल कल्याणकारी संस्थांत भिंतींच्या आड आणि भीतीच्या सावटात आपलं बालपण कंठत असतात. शाळा-शाळांतील मुलांची सुटीतील कला, नाट्य शिबिर घेता-घेता त्यांना या मुलांचं भावविश्व हाक देत गेलं. गजाआडच्या गाजेनं या गृहस्थाचा गहिवर गुंतला. कोल्हापूर, औरंगाबाद, मुंबई, देवरूख अशा अनेक ठिकाणांच्या वंचित विकास संस्थांत राहिले. मुलांची शिबिरे घेतली. मुलामुलींत राहिले. त्यांच्याशी बोलले. मुलांना बोलतं, हसतं, नाचतं केलं. यात त्यांचं ब्रह्मचर्य बहरलं. बालकातला ब्रह्मानंद त्यांनी अनुभवला, उपभोगला. या प्रवासात त्यांना समजलेली मुलं समाजास कळावी, म्हणून त्यांनी या मुलांकडून ३० प्रश्नांची एक प्रश्नावली भरून घेतली, तिचं विश्लेषण केलं. सुमारे १५० मुलामुलींची ही उत्तरं म्हणजे आजच्या बालकांचा चेहराच. ती उत्तरं तुम्हास भीती आणि भिंतीतल्या बाल्याविषयी समजावतात.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१११