पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/128

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देण्या-घेण्याची रुसणी-फुगणी नसतात. उलट आपण आता देऊ शकतो, कुणाचं करू शकतो याचा केवढा मोठा आनंद असतो.
 संस्थेतील मुलांची सर्वाधिक घुसमट होते ती संक्रमण काळात. समाजात सोळावं वरीस धोक्याचं तर संस्थेत अठरावं. सोळा ते अठरा हा काळ विलक्षण घालमेलीचा असतो. संस्थेतून बाहेर पडण्याचे वेध बेचैन करणारे असतात. समाज तर माहीतच नसतो. रीतिरिवाज, चालीरिती, शिष्टाचार, ओळख काहीच नसलेली मुलं ऐन तारुण्यात दुस-या अनाथपणास सामोरी जातात. इथे त्यांना कोण भेटतं, काय मिळतं यावर त्यांचं प्रारब्ध ठरतं. हा काळ 'वैन्याची रात्र' असतो. जो जागा राहील तो जिंकतो. जो फसतो तो बिघडतो. इथं ज्याचा त्याचा विवेक, संस्कार, वृत्ती, आनुवंशिक गुण कामी येतो. संस्थेतील मुलांचं भविष्य असते लॉटरी. आयुष्य असते फकिरी, ‘जो देगा उसका भला, न दे गा उसका भी भला!'
 मला आठवतं-श्यामलाची आई कुमारी माता म्हणून संस्थेत आली होती. श्यामलाला जन्म दिला नि परागंदा झाली. पुढे तिचं लग्न झालं. ती नव-याला चोरून श्यामलाला भेटत राहायची. श्यामलाची शिक्षणातली गती बेताची. आम्ही तिला शिक्षिकेचं प्रशिक्षण दिलं. पुढं जालन्याच्या संस्थेत धाडली. मोठी झाली नि एक दिवस अचानक कुमारीमाता म्हणून दत्त. सारं निरसलं. नोकरी दिली पण ती बाहेरख्याली. एड्स झाल्याचे निदान झालं. तिचं परत परत उद्ध्वस्त होणं सावरलं. संस्थेतल्या इतर मुली सगुणा होत असताना श्यामलाचं असं होणं याचा मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा लक्षात येतं की कधी कधी अतिरिक्त सुरक्षा वरदान न ठरता शापही ठरते.
 बाळ आपटे. घरंदाज. वडील जहागीरदार. हा मात्र मंदिरातल्या चपला चोरायचा. संस्थेत आला. गुणी झाला. पुढे सेनेत मोठा अधिकारी झाला. परत संस्थेत नाही आला. त्यानं संस्थेची ओळखही नाकारली, अव्हेरली. घरानं त्याला जे दिलं नाही, समाज त्याला जे देऊ शकला नाही ते त्याला संस्थेनं दिलं. पण प्रतिष्ठेचा बुरखा त्याला प्यारा ठरला. मला खात्री आहे खोट्या प्रतिष्ठेनं त्याला विवेकी झोप कधीच दिली नसणार. एव्हाना मीही प्रतिष्ठित झालेलो. तो मला ओळख देतो. अट फक्त एकांताची असते.

 अजय लहानाचा मोठा संस्थेत झाला. त्याला मानलेली आई होती. तो

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१२५