पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/135

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पोटी झालेला असल्याने गर्भावस्थेत ती जन्माला येऊ नये यासाठी अनेक खटपटी केलेल्या असतात. अशा सर्व प्रयत्नांस अपयश आल्याने जन्मलेली मुलगी शारीरिक मानसिक व भावनिक दृष्ट्या विसंगत व्यक्तिमत्त्व घेऊन जन्माला येत असते. अशा मुलींचे संगोपन खरे तर मानसिक व भावनिक अतिदक्षता कक्षातून व्हायला हवे. पण आज या संस्थांचे स्वरूप व कार्यपद्धती पाहता ते सध्या तरी अशक्य वाटते. अशा स्थितीत तिच्या जीव अस्तित्वाचे रक्षण करणे हीच मोठी समस्या असते.
 अशा मुलींच्या संगोपन, शुश्रूषा, आहार, आरोग्य मानसोपचाराच्या किमान सुविधाही संगोपन करणाच्या संस्थांत नाही. अशा संस्थांचा भौतिक व भावनिक दर्जा उंचावणे, हे समाजापुढचे प्राथमिक आव्हान आहे.
 आहार व आरोग्य
 संस्थांश्रयी निराधार बालिकांच्या निर्वाहासाठी आज शासन अवघे १२५ रु., दरडोई दरमहा खर्च करत असल्याने समतोल नि सकस आहार या बालिकांना देणे केवळ अशक्यप्राय झाले आहे. आहार योग्य नाही म्हणून आरोग्य व्यवस्थित नाही अशी स्थिती आहे. यासाठी आवश्यक कर्मचारी वर्गही शासन योजनेत अंतर्भूत नाही. बालिकांच्या संगोपनार्थ असलेल्या अर्भकालय, बालसदन, अनाथालय सारख्या योजनांतर्गत शासन केवळ दरडोई अनुदान देते. अशा संस्थांत किमान कर्मचारी सूत्र, वेतन, निवृत्ती इ. योजना शासनाने अद्याप लागू न केल्याने प्रशिक्षित काळजीवाहक, परिचारिका, बालरोगतज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, समाजसेविका, व्यक्ती चिकित्सक इ. पदे बालिकांच्या संगोपनार्थ उपलब्ध झालेली नाही. परिणामी अशा बालिकांच्या आहार व आरोग्याचे प्रश्न दीर्घकाळ अनुत्तरीत आहेत. वयपरत्वे बालिकांचा निर्वाह भत्ता वाढत गेला पाहिजे. त्यांच्या संगोपनविषयक सुविधा समृद्ध होत गेल्या पाहिजेत. पण याकडे संस्था, समाज व शासन अक्षम्य दुर्लक्ष करत आहे.
 मानसिक व भावनिक विकास

 संस्थांश्रयी निराधार बालिकांचे भावविश्व दुखावलेले असल्याने त्यांच्या संगोपन, व्यक्तिमत्त्व विकास, सुसंस्कार याबाबत विशेष खबरदारी देणे व त्यांच्या जीवनातील उणिवा दूर करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होणे आवश्यक आहे. संस्थांमध्ये

१३२...संस्थाश्रयी मुली व महिलांचे प्रश्न