पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/140

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 बालिकाविषयक विद्यमान कल्याण योजना
 संस्थाश्रयी निराधार बालिकांच्या कल्याणार्थ खालील योजना सध्या क्रियान्वित आहेत-
 १) निराधार व बालगुन्हेगार बालिकांच्या संरक्षण व संगोपनार्थ अभिक्षणगृहे.
 २) निराधार, बालगुन्हेगार, अपंग, मतिमंद, उन्मार्गी बालिकांच्या शिक्षण व व्यावसायिक प्रशिक्षणार्थ वर्गीकरण केंद्रे.
 ३) निराधार बालिकांच्या अल्पकालीन निवासार्थ प्रमाणित शाळा.
 ४) देवदासी बालिकांच्या संगोपनार्थ वसतिगृह
 ५) अनाथालय/बालसदन/अर्भकालय चालविण्यासाठी अनुदान
 ६) संरक्षण व जपणुकीची गरज असलेल्या बालिकांसाठी वसतिगृह (केंद्र पुरस्कृत)
 ७) निराधार बालिकांच्या पुनर्वसनार्थ अनुरक्षण गृहे
 या बहुतांशी संस्थांची स्थापना ब्रिटिश परंपरेतील सुधार कार्यक्रमांतर्गत झालेली असल्याने अशा संस्थांचे स्वरूप, कार्यपद्धतीत, अनुदान व कर्मचारी सूत्र इ. सर्वच संदर्भात पारंपरिक व तुरुंगसदृश पद्धतीचा पगडा आहे. समाजकल्याण खाते व त्यांचा निरीक्षण विभाग 'बाबा वाक्यं प्रमाणम!'च्या थाटात उगीचच या संस्थांना जुन्या जोखडात बांधत आहे. नव्या बालन्याय अधिनियमाचे मूळ उद्दिष्ट लक्षात घेऊन उन्मार्गी बालिकांसाठी स्वतंत्र व अनाथ निराधार बालिकांसाठी स्वतंत्र अशा समांतर नि स्वतंत्र संस्था विकसित व्हायला हव्यात. त्यांचे स्वरूप, कार्यपद्धती सूत्र, लाथार्थीचा कालावधी, किमान भौतिक, भावनिक, शैक्षणिक विषयक, आरोग्य विषयक रचनात्मक सुविधा निश्चित करण्याची कसून अंमलबजावणी करणे गरजेचे आहे.

 निराधार बालिकांच्या कल्याणार्थ राबविल्या जाणा-या अनेक संस्था शासकीय असून तेथील कार्य सरासरीपेक्षा खाली असल्याचे 'गांधी जयंती निरीक्षण अभियानात प्रसिद्ध झाले आहे. हे लक्षात घेऊन या क्षेत्रात स्वयंसेवी बालकल्याण संस्थांचा सहभाग वाढविण्याचा धडक कार्यक्रम राबविणे गरजेचे आहे. काही स्वयंसेवी संस्थांचा गुणात्मक दर्जा उंचावण्यासाठीही प्रयत्न आवश्यक आहेत.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१३७