पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/144

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तुम्ही मुलांचे शाळेत नाव घालू शकता. तुमचे नाव, आडनाव त्या मुलास मिळते. तुमचा तो खरा वारस होतो. तुमची संपत्ती, जमीनजुमला तुम्हास त्याच्या नावावर करता येतो. सारं काही जन्म दिलेल्या मुलासारखं तुम्ही करू शकता. अगदी बारशापासून ते लग्नापर्यंत. दत्तक दिलेली मुलं-मुली आज स्वतःचा संसार थाटलेलीही तुम्ही पाहू शकाल.
 या मुलांना कायदेशीर संरक्षणही असतं. ही मुलं घरात वाढत असताना, वाढून मोठी होताना अनेक प्रश्न दत्तक पालकांच्या मनात येत राहतात. मुलास त्याला आपण दत्तक घेतले हे सांगावे का? सांगायचे झाल्यास केव्हा, कसे सांगायचे? या सर्वांबाबत दत्तक देणा-या संस्था, त्यांचे कार्यकर्ते तुम्हास वेळोवेळी मार्गदर्शन करण्यास नेहमीच तत्पर असतात. अनाथाश्रम, बालसदन, शिशुआधार, गोकुळ, वात्सल्य, नंदनवनसारखी नाव धारण करणा-या या संस्था दत्तक घेतलेल्या व दत्तक घेऊ इच्छिणाच्या पालकांच्या बैठका, मेळावे, मार्गदर्शन, शिबिरे आयोजित असतात. त्यातून एक नवी उमेद येते. बळ वाढते व निर्णय पक्का होण्यास मदतही होते.
 मूल दत्तक घेताना आता पूर्वीसारखा विचार आणि उपचारात वेळ दवडण्यात अर्थ राहिला नाही. अंधश्रद्धा झुगारून देऊन वैज्ञानिक कसोटीवर आपण निर्णय घ्यायला शिकले पाहिजे. मूल दत्तक घेणे ही जशी आपली व्यक्तिगत गरज असते तशी ती सामाजिकही असते. अनाथ मुलं दत्तक घेण्यात आता काहीच गैर रााहिलेले नाही. त्यामुळे अशी मुले उघडपणे दत्तक घेऊन त्यांचा सांभाळ मनात कोणताही न्यूनगंड न ठेवता वाढविणा-यांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.

 मूल दत्तक घेण्याने केवळ आपल्या व्यक्तिगत जीवनातील निपुत्रिकतेची पोकळी भरून निघते असे नाही. यामुळे आपली जीवनदृष्टी बदलते. जगण्यातील सार्थकता आपण अधिक आशेने अनुभवू लागतो. मूल जन्माला घालणे यात फक्त शरीर सुखाचाच भाग अधिक असतो. मूल दत्तक घेणे ही संवेदनशीलतेची निशाणी आहे. ती तुम्हास प्रागतिक तर सिद्ध करतेच शिवाय तुम्ही त्यामुळे आपल्या जीवनात आगळे आत्मिक नि आध्यात्मिक सुखही अनुभवता. आठवा एक छोटासा प्रसंग. घरट्यातून पडलेल्या चिमण्या पिलास पाणी पाजतानाचा... एक क्षणिक प्रयत्नाचा आनंद केवढा दिलासा देऊन जातो. इथं तर तुम्ही एक जीव

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१४१