पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/154

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पण काहींना आई, मावशी मिळायची. मोठ्या मुलींना लहान मुलं, मुलीकडे विशेष लक्ष द्यायला शिकवलं जायचं. अशातून आई, ताई, माई, भाऊ, बहीण नाती तयार व्हायची.
 मुलं मोठी झाली की संस्थेच्या मुंबईच्या बालकाश्रमात पाठवायची. ती दिवाळी, मे महिन्यात परत आश्रमात येत राहायची. पुनर्भेटीतून आई-मुलाचं नातं विणलं जायचं. मुली मोठ्या झाल्या की लग्न होऊन सासरी जायच्या. पण माहेरी येत राहायच्या. डोहाळे, बाळंतपणे, दिवाळसण सारं होत राहायचं. मुलं मोठी झाली की सांभाळणाच्या आईला आपल्या घरी घेऊन जायची. मग त्या मुलांचं लग्न व्हायचं. त्यांचं घर, नातं तयार व्हायचं. आश्रमातून अशी कितीतरी घरं, कुटुंबं, नाती तयार झालीत.

 आमच्या या परिवाराचं नाव आहे 'स्नेह सहयोग. नात्याचा धागा प्रेम. एकमेकांस सहकार्य करणं, आधार देणं, सुख-दुःखात सहभागी होणं. आता आमच्या कुटुंबात आम्ही आजी-आजोबा झालोत. घरी सुना, नातवंडं आहेत. सुनांमुळे नवी समाजघरं, कुटुंब, नाती जुळून आमची कुटुंबे आता तुमच्यासारखीच झालीत. घरं, गाडी, घोडे, फ्लॅट, विदेश दौरे सारं सुरू असतं. काही नातवंडं, मुलं, मुली एनआरआय पण. माझंच सांगायचं झालं तर महाराष्ट्रात मला कुठल्याही गावी लॉजमध्ये राहावं लागत नाही. विदेशात युरोपात तर सगळ्या देशात आमची घरं, कुटुंबं आहेत. सगळी कुटुंब आंतरजातीय, आंतरधर्मीय, आंतर्देशीय, आंतरराष्ट्रीय, बहुभाषी, संस्कृतीबहुल! 'वसुधैव कुटुंबम्’, ‘आंतरभारती', 'हे विश्वचि माझे घर' तुम्ही घोकता... आम्ही अनुभवतो... जगतो.

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१५१