पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/158

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 उपेक्षितांच्या संस्थांत भावनिक समृद्धी आवश्यक


 अनाथ, निराधार, बालगुन्हेगार, उनाड, भटकी, भिक्षेकरी, मतिमंद, अंध, अपंग अशी कितीतरी मुले अनाथाश्रम, अभिक्षणगृहे, प्रमाणित शाळा, मान्यता केंद्रे, अनुरक्षण गृहे, अंधशाळा, पुनर्वसन केंद्रे इ. सारख्या विविध सामाजिक नि शैक्षणिक संस्थांत प्रवेशित असतात. या सर्व बालकांचे संगोपन संस्थात्मक पद्धतीने होत असते. या संस्था सुरुवातीच्या काळात समाजाच्या धर्मादाय भावनेतून सुरू झाल्या. पुढे या संस्थांच्या भौतिक नि आर्थिक मर्यादा लक्षात घेऊन आर्थिक अभय दिले. आज या संस्थांना अनुदान व देणगी असे दुहेरी अभय लाभल्याने या शतकाच्या गेल्या जवळजवळ नऊ दशकांच्या दीर्घ कालावधीत त्या भौतिक दृष्ट्या संपन्न झाल्या आहेत. या संस्थांत साधनांची रेलचेल आहे. संगोपन सुविधा आहेत. संगोपन कार्यकर्ते नि अधिकारी आहेत. तरीपण या संस्थांतील बालकांच्या चेह-यावर घराघरातून अनौपचारिक संगोपन लाभलेल्या बालकांच्या चेह-यावर दिसणारी सहजता, निखळ हास्य, चैतन्य, प्रसन्नता अभावानेच दिसून येते. याचे कारण या संस्थांतील भावनिक संपन्नतेचा फारसा गंभीर विचार झाला नाही हेच होय.

 भावनिक संपन्नतेचा अर्थ असा की, संस्थात्मक संगोपन संस्कार, बंधन, शिक्षण, परिपाठ या सर्व गोष्टी सामूहिक पातळीवर होत असतात. तिथे व्यक्तिगत गुण, दोष, प्रवृत्ती, आवड, स्वभाव इ. लक्षात घेऊन बालकांच्या संगोपनाचा गांभीर्याने विचार होत नाही. सब घोडे बारा टक्के पद्धतीने सरसकट संगोपन केले जाते. परिणामी या व्यवस्थेत व्यक्तिविकासास स्वतंत्र असा वाव राहात नाही. मुलांच्या सुप्त गुणांचा विचार करून ते फुलविण्याचे व्यक्तिपातळीवरील प्रयत्न अभावानेच होतात. या संस्था चालविणारे कार्यकर्ते आपली संस्था भौतिकदृष्ट्या संपन्न कशी होईल याकडे अधिक लक्ष पुरवितात. इमारत व साधनांची जुळवाजुळव

महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा...१५५