पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/63

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

गुन्हेगारांना प्रतिबद्ध गुन्हेगार न समजता अजाणतेपणे, अनाहूतपणे, सळसळत्या रक्त दोषाने व भडक माथ्याने केलेले हे गुन्हे शिक्षेपेक्षा माफी व सुधारवादी दृष्टीने पाहण्यात येतात.
 वर चर्चिल्याप्रमाणे युवकांच्या अनेकविध प्रवृत्ती लक्षात घेता युवा गुन्हेगारीचे स्वरूप आपल्या लक्षात येईल. १८ ते २५ हा वयोगट सामान्यपणे ‘युवा गट समजण्यात येतो. या वयोगटातील तरुण-तरुणी आपल्या जीवनाची सुंदर- सुंदर स्वप्ने विणण्यात मशगूल असतात. या वयात ‘चमकतं ते सोनं' अशी त्यांची धारणा असल्याने अंतरंगापेक्षा बहिरंगाचे आकर्षण त्यांना सतत मोहवत नि खुणावत असते. या वयात त्यांच्या स्वप्नविश्वात कुणीही ढवळाढवळ करून चालत नाही. या काळात ते अधिक आग्रही होत असतात. पण ब-याचदा त्यांच्या या सहज विकासाकडे, आशा-आकांक्षांकडे समाज व त्यांचे पालक हे अनुदारपणे वागत असताना दिसतात. परिणामी युवक-युवती प्रतिक्रियावादी होत असतात. एकीकडे प्रौढत्वाकडे वाटचाल करणारे तरुण आपल्या अस्तित्व जाणिवेने सुखावत असतात. अशा वेळी त्यांच्या अस्तित्वाचा अनादर करणे, प्रसंगी ते नाकारणे म्हणजे त्यांना प्रतिक्रियावादी बनवणे असते. 'लाथ मारीन तिथं पाणी काढीन अशी धमक असणारी ही मुलं जीवनात येणारं प्रत्येक आव्हान पेलण्यास मानसिक पातळीवर एका पायावर तयार असतात. याचमुळे प्रेमविवाहास घरातील सदस्यांचा विरोध आहे, हे समजल्यावर ते जसे पळून जाऊन लग्न करतात तसेच आपल्या अपेक्षांची पूर्ती होत नाही, हे पाहिल्यावर ते वाममार्गाने त्या पूर्ण करण्याच्या प्रयत्नास लागतात. युवा गुन्हेगारीचा जन्म होतो तो येथेच.

 युवा गुन्हेगारीचा अभ्यास केल्यास आपणास दिसून येते की, ही गुन्हेगारी आर्थिक स्थितीपेक्षा सामाजिक, परिवारिक वातावरणातून निर्माण होत असते. मुलीस पळवून नेणे, चोरी करणे, धमकी देणे इ. थरापर्यंत मर्यादित असलेल्या या गुन्हेगारीस अनुकरण, साहस प्रदर्शन, पुरुषार्थ दर्शन इत्यादी कारणे असतात. सिनेमा, हेरकथा हे युवकांचे आकर्षण केंद्र असते. १८ ते २५ वर्षांचा काळ हा स्वप्नरंजनाप्रमाणे अनुकरणाचा काळ असतो. पाहिलेल्या सिनेमाचा किंवा वाचलेल्या कथा-कादंब-यांचा त्यांच्यावर या वयात जितका परिणाम होतो तितका तो पालक व शिक्षकांचा होत नसतो. नाही म्हणायला मित्र-मैत्रिणी ही त्यांची श्रद्धास्थाने

६०...युवक आणि गुन्हेगारी