पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/71

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालकल्याण संस्था : स्वरूप, कार्य व बदल


 प्रास्ताविक
 आपल्या देशातील बालविकास कार्याची परंपरा प्राचीन आहे. माणसातील असलेल्या दया, कणव, भूतदया, सहानुभूती इ. वृत्तींमुळे मूलतः व्यक्ती पातळीवर कल्याणकारी कार्याची सुरुवात झाली. पुढे या कार्यास ऋषिमुनींच्या आश्रमीय पद्धतीने संस्थात्मक आधार उपलब्ध झाला. ऋषिमुनींनी आपल्या गुरुकुलात अनेक अनाथ, निराधार मुलामुलींचा सांभाळ केल्याच्या अनेक सुंदर नि भावस्पर्शी कथा प्राचीन वाङ्मयात दिसून येतात. शकुंतलेच्या सांभाळाची कथा सर्वश्रुत आहे. पुढे या कार्याची जागा धर्मपीठांनी घेतली, भारतातील विविध धर्मीय मठांच्या वतीने कल्याणकारी कार्याचा भाग म्हणून अनाथ, वृद्ध इ.च्या संरक्षण व संगोपनाची व्यवस्था करण्यात आली. त्या काळात हे कार्य विशुद्ध मानवतावादी कार्याचा भाग म्हणून केले जायचे. पुढे धर्मसत्ता कामचोर झाल्या नि त्यांची जागा राज्यसत्तांनी घेतली. राज्यसत्तांचा उगमच मुळी व्यक्ती पुरुषार्थ, अहंकार, अधिकारप्रदर्शन वृत्तींच्या पोटी झाला. एके काळी साम्राज्य विस्ताराच्या महत्त्वाकांक्षेने उदयाला आलेल्या राज्यसत्ता लोकांक्षांच्या वाढी व पूर्ततेचा भाग म्हणून प्रजाहितकारी बनत गेल्या. यातून राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या योगक्षेम व कल्याणाची जबाबदारी स्वीकारून आपली ध्येय धोरणे ठरविणाच्या कल्याणकारी राज्य' (वेल्फेअर स्टेट) कल्पनेस बळकटी आली व 'बहुजन हिताय। बहुजन सुखाय।' तत्त्वाधारित कल्याण व विकास योजनांचे नियोजन व अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू झाली.
 कल्याणकारी कार्यक्रमाची पार्श्वभूमी

 याची वैश्विक पार्श्वभूमी अशी आहे. चौदाव्या शतकात इंग्लंडमध्ये कल्याण

६८...बालकल्याण संस्था : स्वरूप, कार्य व बदल