पान:महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण दशा आणि दिशा (Maharashtratil Mahila va Balkalyan Dasha va Disha).pdf/93

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अनेक वेदनारंध्रांनी पोखरलेली ही मुलं-मुली जिद्दीनं लोकांच्या करुणा, दयेवर पोसत असतात. अनाथपण घालवून सनाथ होण्यासाठी विवाह करतात. त्यांच्या विवाहाच्या वेदना, समस्या तर याहूनही भयंकर आहेत.
 अनाथ मुलगा अथवा मुलगी असो, त्यांचे विवाह हे नेहमीच एका अगतिकतेपोटी होत आले आहेत. मुलं-मुली शिकलेली-सवरलेली, कमावणारी, सुस्थिर असली तरी त्यांचे विवाह होणे दुरापास्त असते. समाजजीवनातील जातिधर्माचे स्तोम, नात्यागोत्याचा मोह, सामाजिक प्रतिष्ठा इत्यादींमुळे अनाथ मुलींचे विवाह तर होत नाहीत. झाले तर उशिरा होतात. जे होतात त्यात यशस्वी जीवन जगणारी दांपत्ये हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच पाहता येतील. मुलांचे विवाह बहुधा अनाथ मुलींशीच होतात. मुलींना निष्कलंक, निर्दोष पती मिळणं अपवादानेच शक्य असते. विवाह झाल्यावर मुलींना माहेर नसल्याने पदोपदी अपमान, हेटाळणी सहन करावी लागते. बदल म्हणून कुठे जायची सोय असत नाही. मुलं झाली तरी मामा दाखवता येत नसल्याचं शल्य नेहमीच खुपत असते. मुलांना दिवाळी सणाचा आनंद देणारे सासरे अभावानेच मिळत असतात. या सर्व परिस्थितीत ही मुले-मुली समदुःखी अनाथ मुला-मुलींशीच लग्न करणे पसंत करतात. सामाजिक हेटाळणीची शिकार न होण्याचा तोच एक राजमार्ग असतो. त्यांच्यापुढे शिक्षण घेऊन, नोकरी करून सनाथ होण्यासाठी केलेला विवाह एका नव्या अनाथ जीवनाची सुरुवात असते. या जीवनात जुन्या जागी नव्या वेदना येतात हे जरी खरे असले तरी त्यात वेदना-बदलाचं सुख असते.
 या सर्वांवर जिद्दीने जीवन सफल करण्यासाठी धडपडणा-या या मुलामुलींची खरी वेदना असते ती सामाजिक मान्यतेची, समाजात विलीन व्हायची. ही मुलं-मुली कितीही शिकलीसवरली तरी समाज ब-याचदा त्यांच्याकडे पूर्वग्रहदूषित वृत्तीने पाहात असल्याने ते समाजाचे नैसर्गिक नागरिक होऊच शकत नाहीत.

 हे विवेचन, विश्लेषण क्षणभर तुम्हास एकांगी नि अतिशयोक्तीचे वाटेल, पूर्वग्रह-दूषितदेखील वाटेल. पण ‘जावे त्याच्या वंशा' हे खरे. अनाथ, उपेक्षितांबद्दल आपल्या समाजात जाणिवेचे जागरण जितक्या मोठ्या प्रमाणात व्हायला हवे तितक्या मोठ्या प्रमाणात ते झाले नाही, ही वस्तुस्थिती आहे. अनाथ, उपेक्षितांच्या

९०...अनाथ, उपेक्षितांच्या वेदना