पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१२६

हे पान प्रमाणित केलेले आहे.
९९
राजकीय कर्तृत्व
 

कुलातील राजा श्रीवल्लभ सेनानंद याची कन्या ही त्याची राणी होती. कीर्तिवर्म्याने नल, मौर्य व कदंब यांना जिंकून आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. नलांचे राज्य पूर्वेला नळदुर्गाच्या बाजूस होते. मौर्य हे कोकणात राज्य करीत होते, आणि म्हैसूर, उत्तर कानडा, बेळगाव, धारवाड या प्रदेशावर कदंबांची सत्ता होती. या विजयामुळे चालुक्यसत्ता पुष्कळच विस्तारली. कीर्तिवर्म्यामागून त्याचा भाऊ मंगलीश हा राजा झाला (५९८-६११). कारण त्याची मुले अजून अज्ञान होती. मंगलीशाने कलचूरींना जिंकून मध्य व उत्तर महाराष्ट्रावर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. वेंगुर्ल्याजवळचे सिंधुसागरातील रेवाद्वीप हेही मंगलीशाने जिंकून इन्द्रवर्मा नामक सामंताला तेथे राजप्रतिनिधी म्हणून नेमले. याच्या कारकीर्दीच्या अखेरीस कीर्तिवर्म्याचा मुलगा सत्याश्रय पुलकेशी ( २ रा ) याशी त्याची लढाई होऊन मंगलीश मारला गेला. हा पुलकेशी हाच खरा गादीचा वारस होता. तो लहान असल्यामुळे मंगलीशाला राज्य मिळाले होते. पण पुढे मंगलीशाने पुलकेशीला बाजूस सारून आपल्या मुलालाच राज्य देण्याचा विचार केला. त्यामुळे चुलता-पुतण्या यांचे युद्ध होऊन चुलता मृत्यू पावला व राज्य- लक्ष्मी पुतण्याकडे गेली.

मराठ्यांचा राजा
 हा सत्याश्रय पुलकेशी चालुक्य घराण्यातील सर्वांत मोठा सम्राट होय. दक्षिणेच्या आणि एकंदर भारताच्या इतिहासातही याला फार मोठे स्थान आहे. चालुक्यांच्या राज्याला साम्राज्याचे स्वरूप यानेच दिले. स्वतःचा वारसा प्रस्थापित करताना त्याला चुलत्याशी लढावे लागल्यामुळे त्या वेळी प्रारंभी सर्व राज्यात अराजकच निर्माण झाले होते. आणि पहिला सत्याश्रय पुलकेशी व कीर्तिवर्मा यांनी जिंकलेले राजे ही संधी साधून धुमाकूळ घालू लागले होते. पण हा दुसरा सत्याश्रय आपल्या पित्याप्रमाणे व पितामहाप्रमाणे, किंबहुना त्यांच्यापेक्षाही जास्तच पराक्रमी होता. त्याने लवकरच राज्य विस्ताराची मोहीम सुरू करून थोडक्याच काळात वनवासीचे कदंब, दक्षिण म्हैसूरचे गंग, शिमोग्याचे अलूप यांना जिंकले. त्यानंतर कोकणावर स्वारी करून पित्याने जिंकलेल्या मौर्यांना त्याने पुन्हा पराभूत केले व सागरी लढाई करून त्याने त्यांची राजधानी पुरी ( घारापुरी किंवा राजापुरी ) ही जिंकून घेतली. नंतर तो उत्तर दिग्विजयासाठी निघाला व लाट, मालव व गुर्जर यांना त्याने शरण आणले.
 इ. स. ६३०च्या सुमारास सत्याश्रय पुलकेशीचा, कनोजचा सम्राट हर्षवर्धन तथा शिलादित्य याच्याशी सामना होऊन उत्तरेच्या त्या थोर सम्राटाला पराभव पत्करावा लागला. त्याने बहुतेक सर्व उत्तर जिंकली होती. आता मौर्य, गुप्त या घराण्यांतील सम्राटांप्रमाणे कन्याकुमारीपर्यंत साम्राज्यविस्तार करण्याची आकांक्षा त्याच्या मनात निर्माण झाली. पण त्याचा उद्देश जाणून पुलकेशी आपण होऊनच नर्मदापार झाला व हर्षाच्या सेनेला भिडून त्याने तिचा पराभव केला. पुलकेशीय अखिल भारतीय