पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३१

हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१०४
 

दुर्गाच्या मागून गादीवर आलेला त्याचा चुलता कृष्णराज याने चालुक्यांना जिंकण्याचे काम पुरे करून तोही भाग जिंकला व राष्ट्रकूटांचे आसन दृढ करून टाकले.
 कृष्णराजाने अठरा वर्षे राज्य केले. तेवढ्या अवधीत कर्नाटक, पूर्व चालुक्यांचे वेंगी- आंध्रप्रदेश येथील राज्य व कोकणप्रांत जिंकून मूळच्या साम्राज्याचा त्याने तिपटीने विस्तार केला. राष्ट्रकूट साम्राज्याचा अखिल भारतभर पुढे जो विस्तार झाला त्याचा पाया कृष्णराजाने अशा रीतीने दृढ करून ठेवला होता.
 कृष्णराजामागून त्याचा ज्येष्ठ पुत्र गोविंद दुसरा हा गादीवर आला. पण तो विषयासक्त व विलासी असल्यामुळे त्याचा भाऊ ध्रुवधारावर्ष याने त्याला पदच्युत करून स्वतः सत्ता हाती घेतली. इ. स. ७८० साली तो सत्तारूढ झाला. तेव्हा ५० वर्षांचा होता. राजपदावर येताच प्रथम त्याने गोविंदाचा पक्ष घेणाऱ्या सर्व राजांविरुद्ध मोहीम सुरू केली. प्रथम त्याने गंगवाडी जिंकली व आपला पुत्र स्तंभ यास तेथे सामंत म्हणून नेमले. नंतर कांचीकडे वळून त्याने पल्लवराज दंतिवर्मा यास नमविले. तेथून उत्तरेकडे जाऊन गुर्जरवंशीय प्रतीहार राजा वत्सराज यास त्याने जिंकले. माळव्यातून ध्रुवधारावर्ष हा बंगालचा राजा धर्मपाल यावर चालून गेला व त्याला रणात पराभूत करून तो परत राजधानीस आला. इ. स. ७९३ साली तो मरण पावला. या तेरा वर्षांच्या अवधीत दक्षिण व उत्तर दिग्विजय करून ध्रुवाने राष्ट्रकूट घराण्याला भारतात अग्रपूजेचा मान मिळवून दिला. सातवाहनानंतर विंध्यपर्वत ओलांडून उत्तरेवर चाल करून जाणारा ध्रुव हा दक्षिणेकडील पहिलाच सम्राट होय.

आसेतुहिमाचल
 ध्रुवाचा मुलगा गोविंद ३ रा हा सर्वात मोठा राष्ट्रकूट सम्राट होय. ज्येष्ठपुत्र स्तंभ याचा हक्क बाजूस सारून ध्रुवाने यालाच युवराजपद दिले होते. अर्थातच तो राजपदी येताच भावाभावात यादवी सुरू झाली. पण गोविंदाने सामदंडाने प्रतिपक्षीयांचा मोड करून आपले आसन स्थिर केले. त्यानंतर नित्यक्रमाप्रमाणे कांचीचे पल्लव व वेंगीचे चालुक्य यांवर चालून जाऊन त्यांना नमविले आणि तेथून तो उत्तरेच्या मोहिमेवर निघाला. कनोजच्या सिंहासनावर या वेळी प्रतीहारनृपती नागभट्ट हा आरूढ झाला होता. त्याने सिंधचे मुस्लिम, वेंगीचे चालुक्य आणि मध्यप्रदेशातील काही लहान राजे यांचा मित्रसंघ करून हे राज्य मिळविले होते. आणि सम्राट झाल्यावर माळवा व गुजराथ हेही प्रदेश जिंकले होते. अर्थातच राष्ट्रकूटांच्या सत्तेला हे उघड आव्हान होते. ते स्वीकारण्यास गोविंद ३ रा हा समर्थ होता. म्हणूनच इ. स. ८०६-७ साली कनोजवर स्वारी करून त्याने नागभट्टाचा पराभव केला आणि तेथून तो थेट हिमालयाच्या पायथ्याशी जाऊन भिडला. एवढा विजय गोविंदाने मिळविला. पण तो केवळ दिग्विजय या स्वरूपाचा होता. त्याने कोणाचेही राज्य खालसा केले नाही. नागभट्ट, धर्मपाल यांकडून आपले सार्वभौमत्व मान्य करून घेऊन व विपुल खंडणी