पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/१३३

हे पान प्रमाणित केलेले आहे.
महाराष्ट्र संस्कृती
१०६
 

नेऊन भिडविल्या होत्या. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, माळवा, आंध्र हे प्रांत त्यांच्या प्रत्यक्ष सत्तेखाली होते. त्यांच्या प्रत्येक पिढीला वारशासाठी यादवी झाली तरीही त्यांचे साम्राज्य सवादोनशे वर्षे टिकले हे विशेष होय. कर्तृत्वशाली राजपुरुषांची परंपरा ते निर्माण करू शकले म्हणूनच हे घडू शकले. प्राचीन काळी सर्व जगातच आणि विशेषतः भारतात राजसत्ता या राजांच्या वैयक्तिक कर्तृत्वावरच अवलंबून असत. राजे विषयलोलुप, व्यसनासक्त झाले की राज्ये बुडत असत. म्हणूनच सत्ययुग वा कलीयुग हे राजाच्या कर्तृत्वावर अवलंबून आहे, राजा हाच कालकारण आहे, असे तत्त्ववेत्ते म्हणत. अनियंत्रित सत्ता व अमित धन हाती असताना राजे विलासमग्न, भ्रष्ट न होणे ही गोष्ट आपल्याला दुर्मिळ वाटते. ती तशी आहेही; पण अशाही स्थितीत १४/१५ राजपुरुषांत ९।१० राजे समर्थ व पराक्रमी निघावे हे कोणत्याही घराण्याला भूषणभूतच ठरेल. गोविंद २ रा, गोविंद ४ था हे राजे विषयासक्त व नादान निघाले, पण त्यांना पदच्युत करून स्वतःच्या हाती सत्ता येणारे ध्रुव, अमोघवर्ष व कृष्ण ३ रा यांसारखे राजे त्या घराण्यातच उदयास आले म्हणून राष्ट्रकूट राज्य टिकले. शेवटचा राजा खोट्टिग याच्या कारकीर्दीत त्याच्या पराक्रमशून्यतेमुळे त्याला उतरती कळा लागली. त्याच्या मागोमाग पुन्हा एकदा पराक्रमी पुरुष निपजला असता तर राजसत्ता पुन्हा सावरली असती. पण त्याच्या नंतर राजपदी आलेला कर्क हा अत्यंत नादान होता. त्याचे दोन मंत्री तर इतके अधम होते की ते म्हणजे दोन कलीचे पायच होत असे लोक म्हणत. अशा स्थितीत राज्य टिकणे अशक्य होते. तैलाने जेव्हा उठाव केला तेव्हा खानदेशचे यादव, मध्यप्रदेशातील चेदी व राष्ट्रकूटांचे इतर अनेक सामंत व मित्र त्याला मिळाले. कारण ते सर्वच कर्काच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळले होते. अशा रीतीने कर्तृत्वशाली राजपुरुषांमुळे वैभवास चढलेले हे घराणे त्यांच्या अभावी ४/५ वर्षात एकदम कोसळून अस्तंगत झाले.

कल्याणीचे चालुक्य
 तैल किंवा तैलप याने ज्या चालुक्य घराण्याची सत्ता प्रस्थापित केली ते घराणे बदामीच्या चालुक्य घराण्याशी वारशाच्या नात्याने संबंधित होते असे त्यांच्या लेखावरून दिसते. पण याविषयी संशोधकांना शंका आहे. वैभवाच्या काळी आपल्या घराण्याचे संबंध सूर्यचंद्रांशी आणि मागील काळच्या थोर राजकुलांशी जोडून तथा वंशावळी आपल्या राजकवींकडून तयार करून घेण्याची प्रवृत्ती त्या काळात आणि विशेषतः दहाव्या-अकराव्या शतकात फार होती. या प्रवृत्तीमुळे प्राचीन राजघराण्याच्या वंशावळी शंकास्पद झाल्या आहेत. तैलपाच्या घराण्याची वंशावळही त्याला अपवाद नाही. ते कसेही असले तरी हे कल्याणीचे चालुक्य आपल्याला बदामीच्या चालुक्यांचे वंशज म्हणवीत, एवढे खरे. इ. स. ९७३ ते इ. स. ११५० पर्यंत त्यांचे राज्य टिकले. प्रारंभी राष्ट्रकूटांची मान्यखेट हीच त्यांची राजधानी होती. पुढे ती त्यानी कल्याणीस नेली.