पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/२५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
२२४
 


पद्मचरित्र
 चरित्रग्रंथांत विमलसूरी याने सन ६० च्या सुमारास रचलेले 'पऊम चरिय'- 'पद्म चरित्र' - हे फार प्रख्यात आहे. यात रामचरित्राचे वर्णन आहे. मात्र मूळ वाल्मिकी रामायणापेक्षा हे फार निराळे आहे. मूळ रामायणात राम एकपत्नी आहे. पऊम चरित्रात रामाला चार पट्टराण्या आहेत. ग्रंथाच्या अखेरीस सीता, लव, कुश यांनी जैन धर्माची दीक्षा घेतली असे वर्णन आहे. चरित्रग्रंथांत 'महावीर चरित' हा दुसरा महत्त्वाचा ग्रंथ होय. गुणचंद्रगणी याने हा सन १०८२ मध्ये रचला. हा ग्रंथ महत्त्वाचा खरा, पण हे चरित्र दंतकथात्मक आहे. त्यात ऐतिहासिक दृष्टी नाही. याचे आठ भाग असून श्लोक १२०२५ आहेत. लेखकाच्या शैलीवर कालिदास, माघ, बाणभट्ट इ. संस्कृत कवींचा प्रभाव स्पष्ट दिसतो. आठव्या भागात महावीरांच्या निर्वाणप्राप्तीचे वर्णन आहे. त्या वेळी अकरा शिष्यांना- गणधरांना- त्यांनी उपदेश केला, दीक्षा दिली त्याचे वर्णनही आहे. इतरही महावीरांसंबंधीच्या अनेक कथा ग्रंथात असून निसर्ग- वर्णनेही उत्तम आहेत. 'पासनाह चरिय'- 'पार्श्वनाथ चरितं' ही गुणचंद्रगणीचीच रचना असून ती सन ११११ मध्ये केलेली आहे. याच्या पाच भागात तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांचे चरित्र आहे. हा ग्रंथ गद्यपद्यमिश्रित आहे. काव्यावर संस्कृत शैलीचा प्रभाव असून ग्रंथकाराने अनेक संस्कृत सुभाषिते दिली आहेत. शेवटच्या भागात पार्श्वनाथांच्या निर्वाणाचे वर्णन आहे. त्या आधी त्यांनी मथुरा, काशी, आमलकल्पा या नगरीत केलेल्या कार्याचे वर्णन आहे. पार्श्वनाथांनीही या वेळी अनेक गणधरांना-शिष्यांना-उपदेश केला व दीक्षा दिली शिव, सुंदर, मोप व जय हे त्यांचे प्रमुख शिष्य होत.
 या खेरीज प्रभाकर चरित्र, मनोरमा चरित्र, आदिनाथ चरित्र, कुमारपाल चरित्र, मुनीसुव्रतस्वामी चरित्र, सुपसनाह चरित्र - सुपार्श्वनाथ चरित्र असे अनेक चरित्रग्रंथ व पंचमीकहा, कालकाचार्य कथा अशा अनेक कथा जैनांनी महाराष्ट्री प्राकृतात रचल्या आहेत.
 हे सर्व ग्रंथ काव्यदृष्ट्या चांगले असले तरी त्यांत ऐतिहासिक दृष्टी नाही. हिंदूंच्या या काळातल्या सर्व रचना पुराणवृत्तीच्या आहेत, तशाच जैनांच्याही आहेत. हिंदु- धर्म सोडलेल्या कोणत्याच इतर धर्मीयांनी इतिहासदृष्टी प्रगट केलेली नाही.

पुष्पदंत
 अपभ्रंश किंवा देसभासा या भाषेतील सर्वात श्रेष्ठ कवी म्हणजे पुष्पदंत. हा प्रथम शैव होता. पण पुढे त्याने जैन पंथाचा स्वीकार केला. हा दहाव्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला. त्या वेळी राष्ट्रकूट राजा कृष्णराज ( ३ रा ) हा मान्यखेट येथे राज्य करीत होता. त्या राजाचा महामात्य भरत याने पुष्पदंताला आश्रय दिला आणि ग्रंथ-