पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/४५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४३१
'मऱ्हाष्ट्र राज्य'
 

पण शंभर दीडशे वर्षांत सर्व भारतभर मराठ्यांच्या साम्राज्याचा विस्तार करावा, एवढी प्रचंड शक्ती त्यातून निर्माण झाली असा इतिहासच आहे.

हिंदुपद पातशाही
 छत्रपतींनी मराठ्यांचे राष्ट्र निर्माण करण्याचा उद्योग जन्मभर केला असला तरी, अखिल हिंदुस्थान, अखिल हिंदुसमाज, हिंदुपद पातशाही हे व्यापक ध्येय त्यांच्या नजरेसमोरून केव्हाही ढळले नव्हते. गो. स. सरदेसाई यांनी याविषयी उत्तम विवेचन केले आहे. ते म्हणतात, 'गोब्राह्मणप्रतिपालनाचे ब्रीद, अष्टप्रधानादी संस्था, राज्याभिषेकशकाची निर्मिती, चौथाई, सरदेशमुखीचा अवलंब इत्यादी प्रकारांवरून शिवाजीने इतका मजबूद व विस्तृत पाया रचलेला दिसतो की त्यावर समस्त हिंदुपद पातशाहीची इमारत सहज उभारता यावी. शिवाजीची ही महत्त्वाकांक्षा मराठेशाहीच्या अखेरपर्यंत महाराष्ट्रमंडळाच्या नजरेसमोर सारखी वावरत होती. बाजीराव, मुरारराव घोरपडे, महादजी शिंदे, माधवराव पेशवे, रघूजी भोसले इत्यादी पुरुषांनी याच हेतूच्या सिध्यर्थ कष्ट केले.' (शककर्ता शिवाजी, पृ. २२१) छत्रपतींनी राजा छत्रसाल, राजसिंह, मादण्णा, यांना जी कार्याची प्रेरणा दिली तीवरून त्यांची अखिल भारतीय दृष्टीच स्पष्ट होते. एका तत्कालीन कवीने त्यांना 'दिल्लीन्दपदलिप्सु', दिल्लीपती होण्याची आकांक्षा असलेला, असे म्हटले आहे. त्यावरूनही त्यांच्या हिंदुपदपातशाहीच्या भव्य कल्पनेचाच प्रत्यय येतो. तेव्हा मराठ्यांचे त्यांनी राष्ट्र घडविले, यावरून अखिल हिंदुसमाजाच्या संघटनेचे व त्याच्या उत्कर्षाचे त्यांचे उद्दिष्ट बाधित झाले होते, असे मुळीच नाही. त्या उद्दिष्टाच्या सिद्धीसाठीच त्यांनी ही संघशक्ती निर्माण केली होती.

जातिधर्मनिरपेक्ष
 हिंदुपदपातशाही हे महाराजांचे उद्दिष्ट असले तरी मुसलमानांचा उच्छेद करावा, असे त्यांच्या मनात मुळीच नव्हते. त्यांच्या मनातली राष्ट्र ही कल्पना अगदी शुद्ध स्वरूपातली होती. राष्ट्र ही जातिधर्मनिरपेक्ष संघटना आहे. महाराजांच्या मनातले मराठ्यांचे राष्ट्रही तसेच होते. अनेक पठाणांना त्यांनी लष्करात घेतले होते. दौलतखान हा मुसलमान त्यांच्या आरमाराचा अधिपती होता. मशिदी, कुराण ग्रंथ यांचा अवमान होऊ न देण्याची ते दक्षता बाळगीत. बाबा याकूबसारख्या मुसलमान साधुपुरुषावरही त्यांची भक्ती होती. तुलनेने पाहता जेथे राष्ट्रभावना प्रथम उदयास आली त्या पश्चिम युरोपातही त्या वेळी ती इतक्या शुद्ध स्वरूपात नव्हती. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, इटली या देशांत प्रोटेस्टंट व कॅथॉलिक हे एकमेकांचे हाडवैरी होते. आणि प्रारंभी राज्यकर्त्यांनीही असहिष्णुतेचेच धोरण अवलंबिले होते. शिवछत्रपतींच्या मनाला धार्मिक असहिष्णुता कधीच शिवली नाही. या भूमीच्या, महाष्ट्राच्या सेवेला जे जे कोणी सिद्ध होते त्या सर्वांना जातिधर्मनिरपेक्ष दृष्टीने त्यांनी आपल्या कारभारात