पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५०८
 

बसले होते. मराठ्यांचे स्वराज्य पुन्हा सिद्ध होऊ द्यावयाचे नाही, असाच त्यांचा प्रयत्न होता. त्यामुळे त्यांच्याशी लढणे शाहू छत्रपतींना भागच पडत होते. याच वेळी ताराबाई शाहूराजांचा हक्क नाकारीत होत्या. म्हणून त्यांच्याशी लढाई करावी लागतच होती. आणि सगळ्यांत मोठे दुर्दैव म्हणजे सेनापतीसकट मोठमोठे बलवान मराठा सरदार मोगलांना जाऊन मिळत होते. तसे नसते, ते शाहूछत्रपतींच्या मागे संघटितपणे उभे राहिले असते, तर बादशाही सनदेने स्वराज्य चालविण्याचे छत्रपतींना कारणच पडले नसते. येथील सुभेदारांना जिंकून त्यांनी स्वतःच्या बळावर स्वराज्य पुन्हा स्थापिले असते. पण असा स्वराज्याभिमान त्या मराठा सरदारांना नव्हता. ताराबानईंनाही नव्हता. राजारामांच्या मृत्यूपासूनच त्या बादशहाकडे अर्ज करीत होत्या. त्यामुळे, शाहूराजांनी मांडलिकी स्वीकारली व ताराबाई मात्र स्वतंत्र राज्य करणार होत्या, असा पक्ष मांडण्यात कसलाच अर्थ नाही. त्या काळच्या मराठा सरदारांनाही त्याचे महत्त्व वाटत नव्हते. शाहू, ताराबाई व मोगल यांत कोण बलिष्ट ठरतो याचा अदमास ते पहात होते व त्याप्रमाणे कधी इकडे तर कधी तिकडे असे करीत होते. स्वराज्याचे कसलेही सोयरसुतक त्यांना नव्हते. भरभक्कम वतने मिळून जास्तीत जास्त वैयक्तिक वार्थ जेथून साधेल तो त्यांचा पक्ष. म्हणून मोगलांचा जोर दिसताच, ते त्यांना जाऊन मिळाले. त्यामुळेच, बादशाही सनदेनेच आम्हांला स्वराज्य मिळाले आहे, असे दाखवून, मोगल सुभेदार व हे सरदार याच्या मागचा बादशाही पाठिंबा शाहूराजांना आपल्या मागे उभा करावा लागला.
 पण असे कोणतेही कारण असले तरी मराठ्यांचे स्वराज्य हे पूर्ण स्वतंत्र राज्य आता राहिले नाही हे मान्य केलेच पाहिजे. पुढे नानासाहेब पेशव्याने १७४३ साली माळव्याची सनद मिळविली त्याचा हाच अर्थ आहे. आणि १७९२ साली महादजी शिंदे यांनी वकील मुतलकी हा अधिकार पेशव्यांसाठी व मीरबक्षीगिरी स्वतःसाठी आणली याचाही अर्थ पेशवे बादशहाचे अंकित होते हाच होतो. प्रत्यक्षात ही अंकितता कितपत होती याचा विचार पुढे करू. पण पूर्ण स्वातंत्र्य येथून पुढे राहिले नाही हे नाकारता येईल असे वाटत नाही.

बाळाजी विश्वनाथ
 पेशवाईचा उदय कसा झाला आणि त्या सत्तेला कोणते स्वरूप प्राप्त झाले याचा विचार आपण करीत आहोत. तसे करताना शाहू छत्रपतींच्या प्रारंभीच्या काळातील परिस्थितीचा आपण विचार केला. मराठ्यांच्यांत फूट पाडण्याची मोगलांची वृत्ती, ताराबाईनी माजविलेली दुही आणि प्रमुख मराठा सरदारांची दुही आणि फितुरी या परिस्थितीतून पेशवाईचा उदय झाला. अर्थात, त्या उदयाला मूळ कारण बाळाजी विश्वनाथ याचे कर्तृत्व हे होय, हे उघडच आहे. वरील परिस्थितीत त्याने हे बुडते तारू कसे सावरले ते आता पाहू.