पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५७४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
५४६
 


जाट
 जाट हे शीख, रजपूत यांच्यासारखेच पराक्रमी लोक आहेत. दिल्ली, चंबळ, जयपूर व यमुना या चतुःसीमेच्या भागाला जाटवाडा म्हणतात. औरंगजेबाच्या काळापासून जाट हे मोंगलांशी लढा देत होते. गोपाळ जाट, भजासिंग, राजाराम, चूडामण आणि बदनसिंग असे पराक्रमी लोक त्यांच्यांत निर्माण झाले. बदनसिंगाचाच मुलगा सुरजमल्ल जाट. बादशहा व वजीर सफदरजंग यांचे वैर होते. तेव्हा बादशहाने मराठ्यांना मदतीस बोलविले आणि अजमीर व आग्रा हे दोन प्रांत त्यांना देऊ केले. वास्तविक हे सुभे मराठ्यांनी घ्यावयाचे नव्हते. अजमेर हा रजपुतांचा मानबिंदू आणि आग्रा हा जाटांचा. या वेळी मराठ्यांचा सेनापती राघोबा होता. त्याला हे कोठले कळायला ! तो आल्यावर सुरजमल्लाने चाळीस लक्ष रुपये देऊन समेट करण्याचे बोलणे लावले. हिंदुपदपातशाहीच्या दृष्टीने राघोबाने हे पतकरावयास हवे होते. पण त्याने एक कोटी रुपये मागितले व सुरजमल्लाचा प्रसिद्ध किल्ला कुंभेरी यास वेढा घातला. त्यात यश येईना. पाच महिने गेले. याच वेळी शिंदे-होळकरांचे पुन्हा वैर झाले. जाटाने जयाप्पास आपले बाजूस वळविले. त्यामुळे तो वेढा ढिला करून मारवाडात निघून गेला. मल्हाररावाचा मुलगा खंडेराव या वेढ्यात ठार झाला होता. म्हणून, कुंभेरीची माती यमुनेत टाकीन, अशी त्याने प्रतिज्ञा केली होती. ती वाया गेली आणि शेवटी तीस लक्षांवर तडजोड करावी लागली ! या वेळी जाट किंवा रजपूत यांशी युद्ध न करता सर्व मराठे अयोध्या, प्रयाग या तीर्थक्षेत्रांकडे वळले असते तर मोठा विजय प्राप्त झाला असता, रजपूत व जाट यांनी त्यांना मदत केली असती आणि नजीबखानाचा याच वेळी नक्षा उतरला असता. पण काही ध्येयधोरण आखून, परिस्थितीचा अभ्यास करून, दूरदृष्टी ठेवून, मराठ्यांचा कारभार चाललाच नव्हता. रघुनाथरावाला कसलीच अक्कल नव्हती. मल्हारराव होळकराने नजीबखान रोहिल्यास धर्मपुत्र मानून अभय दिले होते. (त्यानेच पुढे पानपत घडवून आणले). आणि स्वतः नानासाहेब पेशवा या समयी उत्तरेत आलाच नाही. तो आला असता तरी काय झाले असते, ते सांगता येत नाही. कारण रजपुती राजकारणाच्या नाशाला तोच जबाबदार होता. पण जाटांच्या बाबतीत सलोखा करून त्याने शिंदे होळकरांचे सख्य पुन्हा जमविले असते, असे वाटते.

पंजाबचे शीख
 शिखांच्या बाबतही मराठ्यांनी संघटनेचा प्रयत्न करावयास हवा होता. रजपुतांचे जसे राजस्थान, तसाच पंजाब हा आपला देश, असे शीख मानीत. दुर्दैवाने गुरु गोविंदसिंगानंतर त्यांची संघटना करणारा पुरुष शिखांत निर्माण झाला नाही. मीर- मन्नू, आदिना वेग, झकेरियाखान यांसारख्या पंजाबच्या मुस्लिम सुभेदारांशी ते