पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/५९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५७१
मराठ्यांच्या कर्तृत्वाचा हिशेब
 

पेशवा बाजीराव याचा विचार होता. पण छत्रपती शाहू याचा त्याला सक्त विरोध होता, हे मागे सांगितलेच आहे. पण मनात असा विचार येतो की भोपाळला १७३८ च्या जानेवारीत निजामाचा पुरा मोड केल्यानंतर, त्याची पूर्ण विश्रांती करण्याचा मनसुबा जर बाजीरावाने केला असता तर त्या वेळी शाहू महाराजांचा विरोध झाला नसता, आणि झाला असता तरी त्याची फारशी परवा करण्याचे त्या वेळी कारण नव्हते. कारण तसा त्यांचा विरोध उत्तरेच्या स्वाऱ्यासंबंधी सुद्धा होता. १७३८ पर्यंत बाजीरावाचे कर्तृत्व पूर्णपणे सिद्ध झाले होते. पण हाही विचार सोडून दिला तरी मागल्या प्रकरणाच्या अखेरीस सांगितल्याप्रमाणे नानासाहेबांची पेशवेपदी १७४३ साली पुन्हा स्थापना झाल्यानंतर तसा उपक्रम करण्यास काहीच हरकत नव्हती. आणि तेव्हाही हरकत होती, असे धरले तरी, शाहूछत्रपतींच्या निधनानंतर १७४९ सालाच्या पुढे, पेशव्यांच्यावर कोणतेच बंधन नव्हते. तेथून पुढे अकरा वर्षे नानासाहेबाने सर्व- सामर्थ्य दक्षिणेतच खर्चून ती पूर्ण निर्वेध करून टाकली असती तर ? तर मराठा साम्राज्याचे रूप बदलले असते काय ?

स्थैर्य
 माझ्या मते सर्व इतिहासच बदलला असता. आणि मराठ्यांचा झाला यापेक्षा दसपट उत्कर्ष झाला असता. पहिली गोष्ट अशी की दरसाल दसऱ्यानंतर, फौज जमा करून चौथाई किंवा खंडण्या वसूल करणे हा उद्योग आणि त्यासाठी होणारा वारेमाप खर्च हा थांबला असता. पेशवे आणि सरदार स्वारीवर जात ते पैसा वसूल करण्यासाठी, पण परत येताना बहुतेक कर्ज करून येत. १७३८ सालानंतर आठदहा वर्षात निजाम आणि अर्काट, सावनूर, बेदनूर इ. ठिकाणचे नवाब यांच्या सत्ता समूळ नाहीशा करून मराठ्यांनी दक्षिण निर्वेध केली असती तर, विजयनगरच्या साम्राज्याप्रमाणे मराठी साम्राज्याला स्थैर्य आले असते आणि स्वारी, लढाई, युद्ध याखेरीज राज्यकारभारातील इतर उद्योगांकडे लक्ष देण्यास मराठ्यांना वेळ मिळाला असता. सर्व प्रदेश निर्वेध करणे हे केवळ महाराष्ट्रापुरते जरी आरंभी केले असते तरी मराठ्यांचा उत्कर्ष झाला असता.

प्रजा स्वास्थ्य
 दुसरी गोष्ट म्हणजे दक्षिण निर्वेध झाली असती तर प्रजेला काही स्वास्थ्य मिळाले असते. सध्याचा, इंग्रजांच्या आधीचा दोनशे वर्षांचा इतिहास वाचताना, असे ध्यानात येते की हिंदुस्थानभर दरसाल चालणाऱ्या युद्धामुळे प्रजेला, नागरिकांना स्वास्थ्य असे मिळतच नसे. फौजा निघाल्या की त्या वाटेतली गावेच्या गावे लुटून फस्त करीत आणि ज्यावर स्वारी करावयाची असेल तो प्रदेश तर जाळपोळ, विध्वंस, कत्तली यांनी उद्ध्वस्त करून टाकीत. ज्यावर स्वारी एखादे वर्षी झाली नाही असा प्रदेश हिंदु-