पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/६१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५८५
खर्डा - अखेरचा विजय
 

प्रथम ते कार्य साधले आणि १७८४ च्या अखेरीस बादशहाकडून सर्वाधिकार प्राप्त करून घेतले. 'वकील इ मुतलकी' असे या अधिकारापदाचे नाव आहे.

दिल्लीचा बादशहा
 'ज्याच्या ताब्यात दिल्लीचा बादशहा त्याच्या ताब्यात सर्व हिंदुस्थान' असा या विचारसरणीमागे सिद्धान्त होता. मराठयांना त्यावेळी तसे वाटत होते आणि आजही बहुतेक सर्व इतिहास पंडितांनी तसेच म्हणून थोरला माधवराव पेशवा आणि महादजी यांच्या कार्याचा गौरव केला आहे. पण प्रत्यक्ष इतिहास पाहिला म्हणजे याविषयी शंका येऊ लागतात. इ. स. १७७१ च्या अखेरीस मराठयांनी अलाहबादेहून बादशहास आणून दिल्लीच्या सिंहासनावर बसविले. त्यानंतर दीर्घकाळ तर राहोच, पण क्षणभर तरी सर्व हिंदुस्थान मराठ्यांच्या ताब्यात आला काय ? महादजीच्या कार्याबद्दल हाच प्रश्न आहे. १७८४ साली पुन्हा त्याने बादशहास ताब्यात घेतले. त्याला बादशहाने सर्वाधिकार दिले. पण मराठ्यांची सत्ता त्यामुळे तसूभर तरी वाढली काय ? पंजाब शिखांनी व्यापला होता. लढाई केल्याखेरीज रजपूत एक पैसा देत नसत. मुंबई, मद्रास व कलकत्ता येथे इंग्रजी वर्चस्व अबाधित होते. बंगाल तर त्यांनी आधीच गिळला होता. चौथाई म्हणून ते भोसल्यांना एक पैही देत नसत. इंग्रज स्वतः तर प्रदेश व्यापून होतेच. पण त्यांच्या दोस्ताकडेही नजर वळविण्याची कोणाला हिम्मत नव्हती. लखनौचा नवाब असफउद्दौला याच्यावर स्वारी करण्याचा महादजीचा विचार होता, पण कॉर्नवॉलिसने महादजीस कळविले की तो आमचा दोस्त आहे. त्याच्या वाटेस तुम्ही गेला तर आम्हांला मध्ये पडावे लागेल. तेव्हा महादजीस गप्प बसावे लागले. दक्षिणेत म्हैसूरभोवतालचा प्रदेश टिपू बळकावून बसला होता. त्याला नरम करण्यासाठी मराठ्यांना इंग्रजांची मदत घ्यावी लागली. त्या वेळी महादजी दक्षिणेत असता तर ही वेळ आली नसती. सिंध वगैरे प्रांत मुस्लिमांचेच होते आणि ते बादशहाला मुळीच जुमानीत नसत. अशा स्थितीत, 'ज्याच्या हाती बादशहा त्याच्या ताब्यात हिंदुस्थान,' या म्हणण्याला काही अर्थ राहात नाही. आणि त्याला अर्थ नव्हताच. कारण बादशहाच्या ताब्यात काही नव्हते आणि तो किंवा त्याचे १५-२० मुलगे यांच्या अंगी कसलेही कर्तृत्व नव्हते.

हिंदुपदपातशाही
 अशा स्थितीत बादशहाला ताब्यात घेण्याचा हव्यास महादजीने सर्वस्वी सोडून देणे हेच योग्य होते. तो सोडून रजपूत, जाट व शीख, यांच्याशी शक्य त्या मार्गानी संधान बांधणे, त्यांशी सख्य करणे हा मार्ग जर मराठ्यांनी अवलंबिला असता, तर हिंदुपदपातशाहीच्या दृष्टीने, चांगली प्रगती झाली असती आणि मग बादशहाही ताब्यात आला असता. पण प्रथम त्याला ताब्यात घेऊन त्याचा मुख्यत्यार म्हणून