पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७४९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७२३
राजकारण
 


लोकशिक्षण
 १८९३ साली सरकारने चांदीची व रुपयाची फारकत केली. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपये कसे गेले हे टिळकांनी दाखवून दिले. १८९५ साली मॅंचेस्टरच्या कापडावरचा कर सरकारने कमी केला व येथल्या जाड्याभरड्या कापडावरही कर बसविला. यामुळे येथला कोष्टी मरत आहे हे केसरीने स्पष्ट केले आणि अमेरिकेत क्रांती झाली ती असल्याच अन्यायामुळे झाली असे सांगून, आपण क्रांती करणार नसलो तरी अन्यायाचा प्रतिकार म्हणून स्वदेशीव्रत घेतले पाहिजे, असे लोकांना बजावले व याच वेळी सुशिक्षितांनी यात्राजत्रेच्या ठिकाणी जाऊन सरकार कसा जुलूम करीत आहे ते लोकांना समजावून सांगितले पाहिजे, असे तरुणशक्तीला आवाहन केले.

खत्तलवाड
 १८९६ साली दुष्काळ पडला, त्या वेळी 'फॅमिन रिलीफ कोड' तयार करून कोठे साऱ्याची तहकुबी, कोठे सूट, कोठे तगाई असे सरकारने अनेक तऱ्हेचे साह्य जाहीर केले. पण सरकारी अधिकारी याचा विचार न करता चोपून सारा वसूल करीत. त्यांना तशा सूचनाच होत्या. लोकजागृतीची खरी आवश्यकता असते ती येथे. लो. टिळकांनी फॅमिन रिलीफ कोडचे भाषांतर करून त्याच्या प्रती सर्वत्र वाटल्या व गावोगावी सभा भरवून लोकांना आपल्या हक्काचे ज्ञान करून दिले. उंबरगाव पेट्यातील खत्तलवाड येथील सभा फार गाजली. कारण तेथे मामलेदार, असि. कलेक्टर हे सशस्त्र पोलीस घेऊन आले होते. त्यांच्या देखत टिळकांचे स्वयंसेवक प्रो. साठे यांनी 'तुमचे पीक बुडाले आहे, तुम्ही सारा देऊ नका,' असे सांगितले. आणि हे सर्व कायदेशीर असल्यामुळे अधिकाऱ्यांना काही करता आले नाही. बेळगाव, धारवाड, विजापूर, सोलापूर, खानदेश- सर्वत्र अशा सभा चालू होत्या व केसरीतून टिळक तरुणांना, 'तुम्ही रयतेला कायदेशीर हक्कासाठी भांडण्यास शिकवा,' असा उपदेश करीत होते. टिळक म्हणतात, 'कायदेशीर रीत्या सरकारशी भांडण्यास रयतेस कसे शिकवावे, ही विद्या आमच्या पुढारी लोकांस अद्याप शिकावयाची आहे. ती जेव्हा ते शिकतील तेव्हाच सरकारी अधिकाऱ्यांचा उर्मटपणा उतरेल.'

कायदेशीर संग्राम
 सरकारला हे सर्व असह्य होत होते. पण सर्व कायदेशीर असल्यामुळे सरकारला लोकमान्यांच्यावर हात टाकता येत नव्हता. तेव्हा दुसरे काही निमित्त काढून सरकारने टिळकांवर खटला भरला आणि टिळकांनी धैर्याने त्याला तोंड देऊन जेव्हा तुरुंगवास पतकरला, तेव्हा सर्व भारतात नवे चैतन्य निर्माण झाले. कारण हे सर्व अपूर्व होते. गुन्ह्यासाठी, बंडासाठी तुरुंग हे लोकांच्या परिचयाचे होते. पण राजकीय मतप्रचारा-