पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७५८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्र संस्कृती
७३२
 

पुढे त्याचे रूपांतर होऊन त्याला 'डेक्कन कॉलेज' असे अभिधान आणि संपूर्णपणे पाश्चात्य स्वरूप प्राप्त झाले.

बोर्ड
 १८४० साली मुंबईला बोर्ड ऑफ एज्युकेशन ही संस्था स्थापन झाली. तिने सर्वत्र शाळा स्थापण्याचे व मान्यतेचे नियम केले. इयत्तावार अभ्यासक्रम तयार केला. विविध विषयांवर मराठी पुस्तके तयार केली. कॅप्टन कँडी व जगन्नाथ शंकरशेट यांनी या बाबतीत बहुमोल कार्य केले. पुढे अनेक जिल्ह्यांत बोर्डाने शाळा काढल्या व मुमारे ३००० विद्यार्थ्यांची सोय केली. याच शाळांतून बाळशास्त्री, दादोबा पांडुरंग यांनी महत्त्वाची कामगिरी केली. बाळशास्त्री हे शिक्षणशास्त्रज्ञच होते. १८४५ साली सरकारी ट्रेनिंग कॉलेज निघाले. तिचे तेच प्रमुख होते. लोकहितवादी, कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी याच शाळांतून कार्य केले.

महात्मा फुले
 महात्मा फुले यांची कामगिरी विशेष महत्त्वाची आहे. १८५१ साली त्यांनी मुलींसाठी शाळा काढली आणि अस्पृश्यांसाठी शाळा उघडली. या दोन क्षेत्रांत कार्यारंभ करणारे फुले हेच पहिले महाराष्ट्रीय होत.

डेक्कन कॉलेज
 १८५५ साली शिक्षणखात्याची स्थापना झाली व १८५७ साली मुंईला विद्यापीठाची स्थापना झाली व उच्च शिक्षणाची नीट व्यवस्था लागली. १८६३ साली डेक्कन कॉलेजचे दोन विभाग करण्यात आले. इंग्रजीत शिक्षण देणाऱ्या विभागाचे नाव 'डेक्कन कॉलेज' असेच राहून ते गावाबाहेर नेण्यात आले. दुसरा विभाग म्हणजे 'व्हर्नाक्युलर कॉलेज.' तेथे सर्व विषयांचे अध्यापन मराठीतून चालत असे. डॉ. भांडारकर, केरोनाना छत्रे, कृष्णशास्त्री इ. नामवंत प्राध्यापक येथे शिकवीत असत. पण दुर्दैवाने हे कॉलेज एका वर्षातच बंद करावे लागले. कारण विद्यार्थ्यांचा ओढा इंग्रजीतून शिक्षण देणाऱ्या डेक्कन कॉलेजकडेच होता. व्हर्नाक्युलर कॉलेजला विद्यार्थीच मिळेनात. मग त्याचे रूपांतर 'ट्रेनिंग कॉलेज फॉर मेन' या संस्थेत १८६५ साली करण्यात आले.

राष्ट्रीय शिक्षण
 १८८० साली पुण्यात 'न्यू इंग्लिश स्कूल' ची स्थापना झाली व राष्ट्रीय शिक्षणास महाराष्ट्रात प्रारंभ झाला. या शाळेला सरकारी मंजुरी घेणे भागच होते. पण विष्णुशास्त्री, आगरकर, टिळक असे राष्ट्रपुरुष येथे शिकवीत असत; त्यामुळे येथल्या