पान:महाराष्ट्र संस्कृती.pdf/७५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३३
विद्या आणि संशोधन
 

शिक्षणाला निराळेच तेज चढत असे. पुढे पुण्यात प्रथम फर्ग्युसन कॉलेज व नंतर काही वर्षानी स. प. कॉलेज स्थापन झाले. तेव्हा डेक्कन कॉलेज १९३३ साली बंद करण्यात येऊन त्याचे संशोधन संस्थेत रूपांतर करण्यात आले. राष्ट्रीय शिक्षणाच्या प्रयत्नात तळेगाव येथे विजापूरकरांनी राष्ट्रीय शाळेची स्थापना केली. पण सरकारच्या इतरजीमुळे ती लवकरच बंद पडली. पुढे १९२०-२१ च्या चळवळीत टिळक विद्यापीठाची स्थापना झाली. पण हेही फार दिवस चालले नाही. विद्यार्थ्यांचा ओढा फर्ग्युसन, स. प. यांकडेच जास्त होता.

कर्मवीर
 १९३७ साली मुंबईला काँग्रेस मंत्रिमंडळ आले. त्याने शिक्षणाची बरीच पुनर्रचना केली. वर्धा शिक्षणयोजनेप्रमाणे काही ठिकाणी मूलोद्योग- शिक्षण प्राथमिक शाळांत सुरू केले आणि प्रांतातील सात माध्यमिक शाळांत तांत्रिक शिक्षण सुरू केले व त्यात शेतकी, व्यापार, सुतारी इ. उद्योगाचे प्रत्यक्ष शिक्षण देण्यास प्रारंभ केला. याच काळात सातारा जिल्ह्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 'रयत शिक्षण संस्था' स्थापन केली व विद्यार्थ्यांना स्वावलंबी करून शिक्षण देण्याकरिता अनेक प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा व अध्यापन शाळा स्थापन केल्या. या संस्थेचा पुढे खूपच विकास झाला. 'रयत शिक्षण संस्थे'ने या क्षेत्रात खूपच मोठे कार्य केले आहे.
 पाश्चात्य शिक्षणाचा प्रसार याप्रमाणे सर्व देशांत झाला. आता तर तालुक्या- तालुक्याला माध्यमिक शाळा व महाविद्यालयेही निघाली आहेत.

स्त्रीशिक्षण
 स्त्रीशिक्षणाचाही प्रसार, पुरुष शिक्षणाच्या मानाने कमी असला तरी महाराष्ट्रात पुष्कळच झाला आहे. 'नाथीबाई दामोदर ठाकरसी' महाविद्यालयासारखी स्त्रियांची विद्यायलयेही निघाली आहेत. मोठमोठ्या शहरात मुलींच्या स्वतंत्र शाळा आहेत. पण महाविद्यालयांतून व विद्यापीठांतून एकत्रच शिक्षण दिले जाते. काही विद्यालयांत साहित्यशाखेकडे मुलींचाच भरणा जास्त असल्याचे दिसून येते. यांतून उच्चपदी गेलेल्या अनेक स्त्रिया दिसतात. शाळा, महाविद्यालये यांत, वैद्यकी व्यवसायात व इतर व्यवसायांतही अनेक महिला काम करताना दिसतात. महात्मा गांधींनी सत्याग्रह चळवळीत स्त्रियांना सामील होण्याचे आवाहन केले. त्यामुळे स्त्रीसमाजात फार मोठी क्रांती झाली. अनेक स्त्रिया राष्ट्रीय चळवळीत सामील झाल्या. आणि स्त्रीचे समाजातील स्थान एकदम उंचावले. आता बहुतेक सर्व प्रांतात मंत्रिपदी स्त्रिया असलेल्या दिसतात व काही प्रांतात मुख्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी काम केले आहे. तरीही अजून सर्वत्र स्त्रीपुरुष समता प्रस्थापित झाली आहे असे दिसत नाही. खेड्यापाड्यांतून तर नाहीच, पण शहरांतून उच्च विद्याविभूषित घरांतूनही नाही. यांतून कुटुंबसंस्थेचा व