पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/११७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
११०]

[माझा जन्मभरचा


मनाला न पटणारा असा खोटा अभिप्राय देअूं नये असा निश्चय. आणि भलताच अभिप्राय दिला तर, स्वतः ग्रंथकाराला बाजूला ठेवून त्याच्याअैवजी मार्मिक टीकाकार माझ्यावरच कोरडे ओढणार ही भीति ! तात्पर्य, या तिहेरी कात्रीला संभाळून रोज अेक अभिप्राय लिहावयाचा अुपद्रव किती होत असेल याची कल्पना कोणालाहि सहज करतां येअील. अभिप्राय मागणारे लेखक, तो ग्रंथविक्रीला जाहिरातीसारखा अुपयोगी पडावा याकरिताच बहुतेक मागतात. प्रामाणिक यथार्थ गुणदोषदर्शनाकरिता मागणारे थोडे. आणि अुपचाराला बळी न पडतां गुणदोषविवेचक असा स्पष्ट व प्रामाणिक अभिप्राय देणारेहि थोडे.
 (१०२) पण अेका प्रकारचा अभिप्राय देण्याचा मात्र मी कधीहि कंटाळा केला नाही. तो म्हणजे लहान मुलांनी मला कांही भाषाविषयक वाङ्मयविषयक प्रश्न विचारल्यास त्यावर. कारण अशा प्रश्नांची चिकित्सा तीं अितक्या अल्पवयांत करतात याचेंच कौतुक वाटे. आणि नातवंडांनी आजोबाकडे जाअून आपली अडचण मांडावी त्याप्रमाणें अशीं मुलें, जवळचे सर्व साहित्यिक व गुरु सोडून जणुं कांही मी हें त्यांचे हायकोर्ट अशा आदरबुद्धीने, माझा अभिप्राय विचारतात याचा मला मनापासून आनंद वाटतो. आणि मीहि खऱ्या मनाने आठवण ठेवून आवर्जून त्यांना पत्रद्वारें अभिप्राय कळवितों. अशा प्रकारचें अेक पत्र कोल्हापुराहून गेल्या ता. ३ ऑगस्टचें मला आलें त्यांतला मजकूर --
 "पत्रास सुरुवात करण्यापूर्वी आपणांस अेक विनंति करावयाची आहे. आणि ती म्हणजे अशा तऱ्हेने आपणासारख्या थोर माणसांना निष्कारण पोरकटपणाचीं पत्रें पाठवून आपल्यासारख्यांचा अमूल्य वेळ घेणें चुकीचें आहे. आपल्यासारख्यांना अशा तऱ्हेचीं पत्रे पुष्कळ येत असतात व त्यांना अुत्तरें पाठविणेंहि शक्य नसतें ही गोष्ट खरी आहे. पण आपण या पत्राची तशीच गत करणार नाही अशी नम्र विनंति करून मुख्य मजकुराकडे वळतों.
 " मी माझ्या अेका मित्राला अलीबाग मुक्कामाहून अेक पत्र टाकलें. त्यांत असें अेक वाक्य होतें की, 'मी अुद्या न येतां गरुवारी सकाळच्या