पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]
[५
 

 (५) वर्तमानपत्राच्या द्वारें मी सार्वजनिक जीवनांत शिरलों. या जीवनांत मतप्रतिपादन हें अेक मुख्य कार्य व ध्येय ठरतें. आणि या कार्यांत लेखनकला हा अेक मुख्य आधार असतो. मराठ्यांत केसरींत लिहूं लागल्याबरोबर प्रथमपासूनच मी सार्वजनिक कार्योपयोगी संपादकीय काम चांगलें करूं शकेन असा विश्वास माझा मला वाटूं लागला, व लोकांच्या तोंडूनहि तेंच समक्ष किंवा परभारें अैकूं येअूं लागलें. मला इंग्रजी-मराठी माझ्या वर्तमानपत्री कामापुरतें तरी चांगलें लिहितां येत होतेंच. पण या कक्षेपलीकडे जाअून मी ग्रंथकारहि होअूं शकलों; आणि तोहि असा की, वर्तमानपत्राचा संपादक म्हणून मिळणाऱ्या पगाराशिवाय केवळ वाङ्मयांत मी कांही थोडा पैसा मिळवूं शकलों. अशा रीतीने तरुणपणीं साहित्य व वाङ्मय हीं माझ्या खासगी व सार्वजनिक जीवनाला आधारभूत झालीं असें मी म्हणतों.

 (६) यानंतर संपादकाच्या धंद्यांत मला स्वास्थ्य व निश्चितता मिळाल्यावर, प्रौढपणच्या दशेंत साहित्य व वाङ्मय हें मला भूषणासारखें अुपयोगीं पडलें तें असें. सार्वजनिक जीवनांत पडणारीं कित्येक माणसे बुद्धिमान, अुद्योगी, अुत्साही, प्रामाणिक व तळमळीचीं असतात, व तीं आपापल्या कक्षेत पुढारीपणाहि मिळवितात. तथापि त्यांना विद्वत्तेची जोड असावी तशी कदाचित् नसते, किंवा ती असली तरी त्यांच्या मतप्रसारक लेखां-भाषणांना अेक प्रकारचा रुक्षपणा येतो. सुदैवाने माझ्या बाबतींत तसें घडलें नाही. माझ्या कोणत्याहि राजकीय लेखांत किंवा भाषणांतहि सहजगत्या वाङ्मयसाहित्याची थोडीतरी लज्जत अुत्पन्न झाली नाही असें घडलें नाही. माझे राजकीय विचार, टीका, तत्त्वज्ञान हीं कदाचित् तितकीं खोल नव्हतीं असें कांहीच्या दृष्टीने दिसून आलें असेल. पण माझे राजकीय विचार निदान वाङमयदृष्ट्या चित्ताकर्षक पद्धतीने मांडले जातात ही गोष्ट जवळ जवळ सर्वमान्य झाली होती. म्हणून प्रौढ दशेंत वाङमय व साहित्य हें माझ्या सार्वजनिक जीवनाला अुठाव देणारें, खुलवून सजवून दाखविणारें भूषण झालें असें मी म्हणतों.

 (७) यानंतर ओघाने अशी स्थिति प्राप्त झाली की, मी यथाशक्ति करतां आलें तें सर्व करून पासष्टाव्या वर्षी अेक प्रकारें कार्यनिवृत्त झालों.