पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
६]

[माझा जन्मभरचा


मग केसरी-मराठ्याचें संचालकत्व सोडलें, पगारी नोकरी सोडली, ट्रस्टीचा अधिकार सोडला, कायदेकौंसिल, म्युनिसिपालिटी अित्यादि आधी सोडलीं होतींच. अितर अनेक मानाच्या अधिकाराच्या जागा सोडून मी मनाने कार्यपराङ्मुख झालों. अिच्छेप्रमाणें काम करावें वा न करावें असें झालें. द्रव्यप्राप्ति अधिक न करतां जन्मभर गरिबी-मध्यमस्थितींतला सुखवस्तु म्हणून राहण्यासारखा झालों. तेव्हा प्रथमच जिवाला रिकामपणीं कांही करमणूक म्हणून हवी अशी आवश्यकता अुत्पन्न झाली. पण शारीरिक व्यायामाची करमणूक होणें मला शक्य नव्हतें. मला पत्ते, बुद्धिबळें असल्या बैठया खेळांची आवड व मन रमण्याअितकें त्यांचें ज्ञानहि नाही. आणि रिकामा वेळ सापडला म्हणून अुगाच कोणाच्यातरी घरीं किंवा क्लबांतहि जाअून बसून गप्पा मारून वेळ घालविण्याची सवय नाही, स्वभावहि नाही. अशा स्थितींत वाङ्मय व साहित्य यांची करमणूक मला न लाभती, तर माझा वेळ कसा गेला असता याची कल्पनाच होत नाही. १९३२ सालीं माझा ६१ व्या वाढदिवसाचा समारंभ झाला, त्या वेळीं आभारप्रदर्शनाच्या भाषणांत "आजचा हा समारंभ टाअीपरायटरच्या घंटेसारखा कानाला गोड लागणारा, पण 'मर्यादा संपत आली, सावध' असें सुचविणारा, म्हणून भीतिकारक ठरतो" अशी अेक गमतीची अुपमा मी दिली होती. पण त्यानंतर मला आणखी दहा वर्षें आयुष्य अनपेक्षित लाभलें! याचा अर्थ असा- सामान्य टाअीपरायटरची घंटा वाजली म्हणजे अेखादा शब्द लिहिण्यापुरतीच जागा अुरली असें समजावयाचें असतें. पण माझ्या आयुष्याच्या टाअीपरायटरचा सांचा बनविणाराने असा बनविला होता की, घंटा वाजल्यावरहि पुढे लिहून काढण्याला भरपूर जागा राहिली. अर्थात् दहा वर्षें ही घंटा मी कानाने अैकत राहिलों, व त्याबरोबर हाताने टाअीपरायटरचे ठोकेहि पाडीत राहिलों म्हणजे लेखनव्यवसाय करीत राहिलों. केवढी ही गोड करमणूक !
 (८) मात्र ही करमणूक करतांना मीं वाङ्मय लिहिलें तें केवळ ललित स्वरूपाचेंच लिहिलें असें नाही. अभ्यास करून लिहावें असेंहि कांही लिहिलें. १९३२ सालीं मला साठावें वर्ष लागलें तेव्हा माझी लेखणी त्यापुढे थांबेल, विश्रांति घेअील, असें अितरांप्रमाणें मलाहि वाटूं लागलें होतें.