पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/१३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१३२]

[माझा जन्मभरचा


 ( १२८) या वाङमयसाहित्याचा अधिकार ज्याला मध्यम वर्ग म्हणतात, आणि पूर्वीच्या आंकडेगणितांत ज्यांचा अुल्लेख सर्वांत लहान म्हणून केलेला आहे, अशाच अेका लहानशा वर्गाकडे येअून बसलेला आढळतो. ज्यांचा व्यवहार वाङमयाच्या ज्ञानाशिवाय अडत नाही असे लोक शेंकडा ९८-९९ असतात हें पूर्वीं सांगितलेंच आहेत. अुरला अेक-दोन टक्के वर्ग हाच काय तो कधी काळीं वाङमयसाहित्य वाचणारा. पण फिरून त्यांपैकीच फार थोड्या लोकांना स्वतः वाङ्मयसाहित्यनिर्मिति करतां येते. अेकीकडे श्रीमान वर्ग हा आपल्याच अैश्वर्योपभोगांत मग्न असतो, सुखावलेला असतो, श्रम केल्याशिवाय त्याला जगतां येतें. तो वाङ्मय-साहित्यांत लक्ष घालीत नाही. आणि दुसऱ्या बाजूला प्रचंड असा दरिद्री किंवा गरीब लोकांचा वर्ग. श्रीमान लोक कदाचित साक्षर तरी असतात पण गरीब लोकांना धन नाही त्याप्रमाणें साक्षरताहि नाही. मग ते बिचारे वाङ्मयनिर्मिति काय करणार ? तात्पर्य, मानवजातीच्या अितिहासाकडे पाहिलें तर मध्यम वर्ग हाच सर्वांत महत्त्वाचा ठरतो. याचें कारण समाज जिवंत राहण्याला ज्या हालचाली, जीं परिवर्तनें, व ज्या क्रांत्या, आवश्य असतात त्या सर्व या मध्यम वर्गाच्या मनांतून निर्माण होतात. समाज-जीवनाच्या अथांग समुद्रावर जीं वादळें आजपर्यंत झालीं आहेत तीं सर्व या मध्यम वर्गाच्या केंद्रभूमींतच झाली आहेत. कारण काय असेल तें असो, पण मध्यम वर्गांतील सुशिक्षित मनुष्य हा असा असतो की, सामाजिक वातावरणाचा दाब, व त्यांतील आर्द्रता रूक्षता, ही मोजणारा बॅरॉमीटर होण्याची पात्रता फक्त या मध्यम वर्गाच्याच अंगी असतें. या वर्गांतील लोकांनीच ग्रंथ रचले, वाचले, संभाळले व लोकांना समजून सांगितले. हें काम अेका टोकाच्या श्रीमंतांनी व दुसऱ्या टोकाच्या दरिद्री लोकांनी कधीहि केलेलें नाही. म्हणून श्रीमंताला वेळेचें काय करावें हें समजत नाही, व गरिबाला कांही करावेंसें वाटलें तर त्याला वेळ नाही. म्हणून दोघेहि सारखेच निरुपयोगी. मध्यम वर्ग हाच अेक असा आहे की, जो आळशी होण्याअितका सुखावलेला नाही व सुखाच्या विश्रांतीचा अेक क्षणहि मिळत नाही असा दरिद्री नाही. मनुष्याला विश्रांतीचा असा काळ थोडा तरी मिळणें यावरच जगाची प्रगति बरीचशी अवलंबून असते. तत्त्ववेत्ता बरट्रँड रसेल म्हणतो--