पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१४]

[माझा जन्मभरचा


योग्यता, याहून पुढे जाअून अधिकारी या नात्याने त्याच्या पायरीला पाय लावणें हा अुपमर्द, अशी भावना असल्याचें त्याला स्मरेल. आणि मी तर स्वतःविषयीं क्षुद्र भावनेने ग्रासलेला असा विद्यार्थी! त्या वेळीं मला जर कोणी असें म्हटलें असतें की ' केळकर, तुम्ही अेक वेळ या कॉलेजचे ट्रस्टी ( म्हणजे मर्यादित मालकच ) व्हाल', तर मी त्याला काय म्हणालों असतों याची कल्पनाच करावी ! परंतु ती गोष्ट यदृच्छेने घडली खरीच. सरकाराने डेक्कन कॉलेज बंद करून अिमारती विकायला काढल्या. त्याविरुद्ध फिर्याद होअून अखेर हायकोर्टांत आपसांत समजूत झाली, व डेक्कन कॉलेजचें संशोधन-संस्थेत रूपांतर होअून अिमारतीचा ट्रस्ट करून ती पांच ट्रस्टींच्या स्वाधीन करण्यांत आली. तेव्हा ना. खेर यांनी मला त्यांपैकी अेक ट्रस्टी नेमलें. या नेमणुकीनंतर मी अेकदा मुद्दाम अेकटाच जाअून डेक्कन कॉलेजच्या अिमारतींना भेट दिली. आणि मी १८९१ चा कॉलेजचा जुना विद्यार्थी, व आज १९३९ सालपासूनचा त्या अिमारतीचा ट्रस्टी, या दोन मानसिक अवस्थांची सांगड घालून देअून विचारांत व महानंदांत दंग होअून गेलों

 (१७) तात्पर्य, माझ्या वेळच्या विद्यार्थ्यांपैकी जे अत्यंत हुषार बुद्धिमान होतकरू विद्यार्थी होते त्यांनी पुढच्या आयुष्यांत मिळविलेली कीर्ति व यश, आणि त्यांच्या वेळीं स्वतःकडून व लोकांकडून अगदी सामान्यांमध्ये गणल्या गेलेल्या, व ज्याच्याविषयी कोणताहि भावी अुज्ज्वल मनोरथ बांधतां येत नव्हता अशा मला, अुत्तर आयुष्यांत लाभलेली कीर्ति व यश, याची तुलना केली म्हणजे, दैवाच्या कर्तबगारीचें नवल वाटतें याहून अधिक कांही म्हणतां येत नाही !

 (१८) मी सांगत होतों तें हें की, माझ्या समकालीन कांही विद्यार्थ्यांमध्ये मी कमी बुद्धिवान होतों. उदाहरणार्थ, गणित किंवा विज्ञान हे विषय प्रयत्न करूनहि मला चांगले शिकतां आले नसते असें मला खचित वाटतें. आणि पहिल्या बी. अे. पर्यंत मी या विषयांत कसा पास होत गेलों याचें माझें मलाच नवल वाटतें. असें असतां भाषाविषयांत माझी गति त्या मानाने बरी झाली याचें कारण इतकेंच की, बुद्धीचा तो विशिष्ट प्रकार मला जन्मतःच अनुकूल होता. आणि असें म्हणावेंच लागतें. कारण मनुष्य-