पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/२५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
१८]

[माझा जन्मभरचा


होतें. तें पाहून माझ्या सोबत्यांनी आश्चर्य प्रगट केलें. मला केवढा अभिमान वाटला तो सांगतां पुरवत नाही. तसेंच या सुमारास टिळक व आगरकर या दोघांचे वाद केसरी व सुधारकांतून जोराने सुरू होते. त्यांना अुद्देशून, त्या दोघांनाहि दोष देअून, टीका केलेलें अेक पत्र मी 'ज्ञानप्रकाश' कडे पाठविलें. त्या पत्राची नक्कल मी कौतुकाने अजून जपून ठेवली आहे. हें पत्र ' गतगोष्टी' या पुस्तकांत पृष्ठ १६९-७३ येथे सर्व छापलें आहे. याच दोन वर्षांच्या अवधींत ' शिवाजीचा बंदिवास व सुटका' या विषयावर मी अेक नाटकहि लिहिलें होतें. परंतु तें कै. वासुदेवशास्त्री खरे यांजकडे वाचण्यास दिलें असतां त्यांनी अैतिहासिक दृष्टीने नापसंत करून, त्यांत अितक्या चुका दाखविल्या की तें पुढे छापण्याच्या भानगडींत मी पडलों नाही. मात्र अेल्अेल्. बीच्या अभ्यासाकरिता साताऱ्यास असतां, तेथे कोणी अेका बंडोपंत दाढे नामक गृहस्थाने खासगी नाटक कंपनी काढली होती तिने तें नाटक बसविण्यास घेतलें होतें. पण प्रयोग होण्यापूर्वीच कंपनी मोडली आणि त्यांनी माझ्या नाटकाची प्रतहि हरवली! तेव्हापासून कोणाची हस्तलिखित प्रत म्हटली म्हणजे मला त्याची बेसुमार जबाबदारी वाटते; व म्हणून मी ती सहसा ठेवून घेत नाही.

 (२४) साता-यास अेल्अेल्. बी. चा अभ्यास करीत असतांच, तेथील पुढारी काँग्रेसहून जाअून आले म्हणजे त्यांच्या अभिनंदनार्थ कविता व पदें करणें व त्यांच्याविषयी सर्भेत भाषणें करावयाचीं तीं लिहून पाठ म्हणणें, ही कामगिरी मजकडे येत असे. कै. दत्तोपंत पारसनीस यांनी अेक लहानसें मासिक पुस्तक सुरू केलें होतें, त्यांत मी लहानसहान लेख लिहीत असें. या मासिक पुस्तकाचें नांव सुप्रसिद्ध 'केरळकोकिळ' याच्या अनुकरणाने 'महाराष्ट्र-कोकिळ" असें ठेविलें होतें. तसेंच साताऱ्यास अेल्अेल्. बी. चा अभ्यास करतांना Toleration व Legal Profession या विषयांवर मी अिंग्रजी निबंध लिहून सभेपुढे वाचले. पैकी दुसऱ्या निबंधांत मी केलेल्या वकिलीच्या धंद्यावरील टीकेने वकिलमंडळींत बरेंच काहूर माजलें असें मला स्मरतें. यावेळी साताऱ्यास " बोधसुधाकर" या नांवाचें अेक जुनें वर्तमानपत्र असे. त्याचे संपादक वामनराव दीक्षित म्हणून असत. ते अिकडून-तिकडून कोणाचे तरी लेख घेऊन वर्तमानपत्र भरून काढीत. आणि हा अेक बरा