पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग]

[२३

 याच कालावधींत 'माझा आवडता फकीर' या नांवाची कविता मी केली. ती ह. ना. आपटे यांच्या करमणुकींत प्रसिद्ध झाली. आजहि माझ्या मतें तीं चांगली साधली असून, तेव्हाप्रमाणें अजूनहि ती वाचकांना फार पसंत पडते. ( गेल्या ता. ५ जुलै रोजीं, ही कविता आपल्या संग्रहांत घेतल्याबद्दल, अेका प्रकाशकाने मला दहा रु. पाठविले ! ) नित्य रात्रीं दहाच्या सुमारास अेक फकीर, त्या कवितेंत केलेल्या वर्णनाचा, माझ्या घरावरून जाअी. सात्त्विक भिक्षावृत्तीचा तो अेक उत्कृष्ट नमुना होता.'आनंद रहो आबादीआबाद' असें कांहीसें म्हणत तो जाअी. तो कोणत्याहि घराशीं थांबत नसे. यामुळे, तशा रात्रीच्या दहा वाजण्याच्या वेळींहि, घरांतील माणसें त्याच्याकरिता ठेवलेली भिक्षा त्याला थांबवून त्याच्या झोळींत टाकण्यास टपून बसत. अगदी घड्याळ लावल्या वेळेप्रमाणें तो माझ्या घरावरून जाअी. हें पाहून स्फूर्त झालेले विचार त्या कवितेंत दिले आहेत.

 (२९) १८९४ च्या नोव्हेंबरांत अेल्अेल्. बी. ची परीक्षा मुंबअीस देऊन मी साता-यास आलों. त्यानंतर चार आठवड्यांनी परीक्षेचा निकाल लागावयाचा होता. त्या अवधीचा फायदा घेअून मी शेरिडनच्या 'रायव्हल्स' या नाटिकेचें मराठी रूपांतर केलें. शेरिडनच्या या नाटिकेपेक्षा गोल्डस्मिथच्या नाटिका मला अधिक आवडत, व त्या मी कॉलेजांत शिकलोंहि होतों. पण त्या हाताशीं नव्हत्या. म्हणून शेरिडनवर भागविलें. हाच माझा गद्यलेखनाचा पहिला प्रयत्न. तोच माझा पहिला गद्यग्रंथ. यानंतर साता-याच्या मुक्कामांतच अेका टागोर बंधूच्या (जोतिरींद्रनाथ) 'सरोजिनी' नामक बंगाली नाटकाचें मीं भाषांतर केलें. हीं दोन नाटकें मी पुण्यास आल्यावर प्रसिद्ध झालीं.

 (३०) १८९६ च्या मार्च महिन्यांत टिळकांना येअून मिळाल्यावर सवा-दीड वर्षांत, म्हणजे टिळकांवरील पहिल्या खटल्यापर्यंत (१८९७ सप्टेंबर ) मी केसरींत कांहीच लिहिलें नाही. त्या खटल्यांत टिळकांना शिक्षा झाल्यानंतर दोन वर्षें मी केसरीचा जबाबदार संपादक झालों, तेव्हा मधून मधून केसरीत लिहूं लागलों. पण ते लेख टिळकांच्या गैरहजेरींत लिहिले गेले, आणि टिळक परत आल्यावर तरी केसरींतील अमुकच लेख माझे असें