पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[२९


अित्यादि. ' लोकमताच्या ठिणग्या' हें सदर अशाकरिता केलें की, विचार तेच पण शब्द-पाल्हाळ न करतां थोडक्यांत फुटाणे अुडवावे तसे चार दोन चटकदार ओळींत विचार सुटे सुटे लिहावे. संक्षेपाने लिहिण्यांत, बेटाळीं आवळून वळलेल्या 'स्प्रिंग' कमानीसारखें, विचार प्रगट करण्याला अेक प्रकारचें आंतून बळ येतें. या प्रकाराचें अेक अुदाहरण १९२९ च्या अेका केसरींतलें देतों.

लोकमताच्या ठिणग्या

(१) पाहा ! चळवळ कशी करावी हें मुसलमानांपासूनच शिकावें.
(२) शारदा-बिल अुद्या पूर्ण रद्द न झालें, तरी मुसलमानांना तें लागू करूं नये अितकें तरी खास होणार. चळवळ चळवळ !
(३) मग हिंदूंनीहि काय थोडी चळवळ त्या बिलाविरुद्ध चालविली आहे ?
(४) पुण्यांत 'तुळशीची आमटी' झाली. आणि पंढरपुरांत 'धुरळ्याचा भंडारा ' अुधळला तितकाचना !
(५) अहो ! तुमच्या महाराष्ट्राच्या हातून तितकेंच व्हायचें. महाराष्ट्राला बालविवाह मनापासून हवा होता कधी ? जशी असेल मनांत तळमळ तशी होअील हातून चळवळ ?
(६) बरे बिचारे ते पुराणमतवादी टिळक १८९१ सालीं मिळाले म्हणून संमति-वयाच्या बिलाविरुद्ध चळवळ झाली !
(७) हं: ! ! पण आज टिळक असते तरी काय अुपयोगी होते म्हणा !
(८) नव्या कायदेकौन्सिलाबद्दल त्यांनी १९१९ सालीं जाहिरनामा लिहिला, त्यांत कौन्सिलाकडून समाज-सुधारणा करूं नये असें कांही त्यांनी लिहिलें नाही.
(९) टिळक शहाणे होते. त्यांना पुढे काय होणार हें पूर्वीपासून दिसतच होतें. मग आपल्याच हाताने लिहून आपला अपमान भावी पिढीकडून कां करवून घेतील ते ?