पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही



प्रस्तावनेदाखल चार शब्द

 सोळा वर्षांपूर्वी 'सह्याद्रि' मासिकाच्या एका संबंध अंकांत (सह्याद्रि सप्टेंबर १९४२) कै. न. चिं. केळकर यांनीं आपल्या वाङ्मयसेवेबद्दल सुमारें दीडशें पृष्ठें होईल एवढा एक विस्तृत लेख लिहिला होता. त्याला त्यांनीं " माझा जन्मभरचा एक उद्योग " असें नांव दिलें होतें. तो लेख आज या पुस्तकाचे रूपानें पुनर्मुद्रित केला आहे. शाळा कॉलेजांत लागणाऱ्या क्रमिक पुस्तकांत तात्यासाहेब केळकर यांच्या वाङ्मयांतील उतारे नित्य आढळतात. पण त्या लेखासंबंधी, लेखकासंबंधी किंवा त्याच्या वाङ्मयसेवेसंबंधी निश्चित अशी माहिती विद्यार्थ्यांना फारच थोडी असते; ती माहिती स्वतः ग्रंथकर्त्याकडूनच प्रायः लिहिलेली उपलब्ध झाली तर अधिक बरें, असाहि हें पुस्तक प्रसिद्ध करण्यांत हेतु आहे.
 केवळ वाङ्मयापुरतीच नव्हे, तर तात्यासाहेबांच्या इतर सार्वजनिक आयुष्याबद्दलहि थोड्याफार माहितीची विद्यार्थ्यांना जरूर असते. याकरिता, परिशिष्टरूपानें चार विस्तृत मुलाखती या पुस्तकांत छापल्या आहेत. त्यांत त्यांच्या सर्व सार्वजनिक व खासगी आयुष्याचा मार्मिक आढावा संभाषणरूपानें आलेला आहे. "मी कां लिहितों?" हा लेख तात्विक असल्यानें पुस्तकाच्या शेवटीं आलेला आहे. तात्पर्य, कालनिर्देशाचे दृष्टीनें यांतील मुलाखती १९३२ सालच्या; "माझा जन्मभरचा एक उद्योग" हें सह्याद्रींतील लिखाण १९४२ सालचें; आणि "मी कां लिहितों?" हा लेख १९४७ सालचा. यांप्रमाणें, त्यांच्या वाङ्मयविषयक चरित्रासंबंधींचा सर्व मजकूर या पुस्तकांत ग्रथित केलेला आढळेल.

 पुणें         का. न. केळकर.
१ नोव्हेंबर १९५९.