पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/६२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
अेक अुद्योग ]

[५५


निरनिराळ्या विषयांवर बोलत असतां. जणु कांही विषय, व्यक्ति आणि तास यांचा, आपला वेळ केव्हा कोणी किती घ्यावयाचा ह्याबद्दल, आगाअू संकेत ठरूनच, सारे व्यवहार चाललेले असतात !" दुपारची वामकुक्षी आणि रात्रीची झोप यांना वांटून दिलेला मोजका वेळ सोडला, तर बाकीच्या त्यांच्या वेळाचा प्रत्येक क्षण बोलण्यांत, लिहिण्यांत, वाचण्यांत किंवा मनन करण्यांत जात असतो. कोल्हटकर हे आयुष्याकडे अुपभोगाच्या दृष्टीने पाहतात, तर केळकर हे आयुष्याकडे अुपयोगाच्या दृष्टीने पाहतात. आणि या दोघां साहित्याचार्यांच्या या विशिष्ट दृष्टिकोणाचा परिणाम त्यांच्या वाङ्मयावर झालेला स्पष्ट बघावयाला मिळतो. कोल्हटकर यांचें वाङ्मय मुख्यतः रंजनप्रधान, तर केळकरांचें वाङ्मय मुख्यतः ज्ञानप्रधान आहे; व कोल्हटकर यांच्याकडे गेलें असतां मनुष्य जसा आनंदित होअून परत येतो, तसा केळकर यांच्याकडे गेलें असतां तो उद्बोधित होअून परत येतो. कोल्हटकर यांच्या साध्याहि बोलण्यांत जशी कल्पकता व्यक्त झालेली असते, तसा केळकर यांच्या साध्याहि बोलण्यांत त्यांचा बहुश्रुतपणा प्रतिबिंबित झालेला असतो; व त्यामुळे त्यांचे अगदी स्वैर कथालापसुद्धा अुपदेश होअून बसतात.
 पण या दोघा मित्रांच्या आयुष्याकडे पाहण्याच्या दृष्टींत जरी फरक असला, तरी त्यांच्या स्वभावांत मात्र पुष्कळच साम्य आढळतें. "
 ( वसुंधरा - दिवाळी अंकांत (१९३१) ग. त्र्यं. माडखोलकर).
 रा. ग. वि. केतकर, केसरीचे पूर्वी अेक वेळचे व मराठा पत्राचे विद्यमान संपादक लिहितात ---
 " सभाचालकांच्या मनांत हा विश्वास तात्यासाहेब यांनी आपल्या कृतीने अुत्पन्न करून ठेवला आहे. व्याख्यानें अैकून भागलेला व कांटेकोर दृष्टीचा किंवा अेक प्रकारें दुर्ललित बनलेला पुण्याचा सुशिक्षित श्रोतृवृंद हा तात्यासाहेब यांचें अध्यक्षीय भाषण अैकण्यासाठी, अितर कंटाळवाणी भाषणें अैकण्याची अगर समारंभिक क्रिया पाहण्याची शिक्षा भोगीत बसलेला असतो; व तात्यासाहेब अुभे राहिले, म्हणजे ते कांही नवे मार्मिक विचार अुद्बोधक व चटकदार रीतीने मांडतील अशी त्याची खात्री असते.