पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६६ ]

[माझा जन्मभरचा


जाते. 'मला काय लिहितां येणार आहे ( ! )' ही भावना निवळ भ्रमात्मक असते. अेका अिंग्रज ग्रंथकाराने असें म्हटलें आहे की “If every man only Makes the effort he can, before his death, produce a book worth reading by the public." म्हणून माझी पुढल्या पिढीच्या तरुण मुलांना अशी स्पष्ट सूचना आहे की, त्यांनी प्रत्येक विषयावर आपापली मतें निश्चित करावीं. वाचनाने व विचाराने तीं सुधारावीं, परिणत करावीं. साधनांच्या अनुकूलतेप्रमाणें अधिकांत अधिक लोकांना तीं पटवून देण्याची महत्त्वाकांक्षा धरावी. आणि असें झालें तर देशांत वाङमयवृद्धि होअील व ती वाङ्मयवृद्धि समाजाच्या प्रगतीला हटकून अुपयोगी पडेल.
 (५२) बहुश्रुतपणा या गुणाचें चीज व्हावें तितकें होत नाही असें मला वाटतें. पण बहुश्रुतपणा हाच विद्वत्तेचा मूळ पाया आहे; व तरुण पिढीला वाचनाचें व अभ्यासाचें व्यसन जडलें तर त्यासारखा तिला स्वतःला व समाजाला दुसरा लाभ नाही. वाचनाची आवड, वाङमयविलासाचा आनंद, आणि मतप्रतिपादनाची हौस, या तीन गोष्टी अनुकूल असतील तर समाजांत अनेक निरनिराळ्या प्रकारचें वाङ्मय आपोआप अुत्पन्न होअूं लागेल. आणि हें वैचित्र्य सहज सिद्ध होण्याचें कारण असें की, मनुष्य हा त्रिगुणात्मकच नव्हे तर अनेक गुणात्मक असतो. सत्त्व रज तम या गुणांतहि अनेक पोटभेद व बारीक प्रकार असतातच. प्रत्येक मनुष्याची आवड-निवड जशी विविध, किंवा प्रत्येक मनुष्याची चालण्याबोलण्याची, बसण्याअुठण्याची, पोषाख पेहेरावाची ढब जशी निरनिराळी असते, त्याप्रमाणें मतप्रतिपादनांत व लेखनकलेंतहि प्रत्येकाचा गुण अभिरुचि हीं वेगवेगळी असणारच. म्हणून तेंच मत सांगावयाचें असतां, तेंच कथानक कथावयाचें असतां, किंवा तीच कल्पना रंगवावयाची असतां, कोणी निबंध लिहील, कोणी नाटक लिहील, कोणी कविता करील, कोणी विनोदी लेख लिहील. आणि हे सर्व वाङमयाचे अभिजात प्रकारच होत. ज्ञानविचार किंवा मत हा आत्मा होय आणि भाषा हें त्याचें शरीर होय. शरीर सुरूप किंवा कुरूप लाभणें हें आपल्या हातचें नाही. त्याप्रमाणें आपण लिहूं तें वाङमय चित्ताकर्षक होअील ही गोष्ट आपल्या हौसेची असली तरी हातची