पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
अेक अुद्योग ]

[ ६९


केळकरांच्या स्वभावांत विनोदाची आवड प्रामुख्यानं आहे. विनोद करण्याचं त्यांचं सामर्थ्यहि मोठं आहे.
 " शक्य तितके साधे शब्द, शक्य तेवढी आटपशीर व स्वतःचा तोल अैटीनं संभाळणारीं वाक्यं, अेकामागोमाग अेक लिहिलेल्या वाक्यांची बनत गेलेली ज्योत, अेकदम प्रदीप्त करणारी प्रश्नार्थक अगर अुद्गारात्मक वाक्यं, अित्यादि गोष्टींना केळकरांच्या भाषाशैलीचे खास गुणविशेष म्हणतां येअील. परंतु या गुणांचा परिणाम वाचकांवर घडतो, याचं कारण केळकरांची युक्तिवादात्मक विचारसरणी व त्यांच्या लेखनाची नमुनेदार टापटिपीची रचना, यांना त्याच गुणविशेषांचे अलंकार अगदी बरोबर शोभतात हें होय. काळकर्ते परांजपे व केळकर यांची तुलना मला अिथं करावीशी वाटते. परांजपे अतिशय श्रेष्ठ प्रतीचे वक्ते होते; पण त्यांचं भाषण अैकतांना त्यांचं जणूं लेखनच चाललं आहे असं वाटे. उलट, केळकरांचा कोणताहि निबंध वाचतांना ते लिहीत नसून आपल्याशीं बोलत आहेत असा वाचकाला भास होतो ! केळकरांची भाषा प्रतिष्ठित असूनहि अतिशय खेळकर आहे, अेवढं सांगितलं की त्यांच्या भाषेचे सारे गुणविशेष त्यांत आले. अितकी सहज प्रवाही, धावती, व आपल्या बारीक- सारीक हालचालींत सौंदर्य दर्शविणारी भाषा केळकरांनीच प्रथम लिहून दाखवली. आणि अशा या कमाविलेल्या भाषेच्या साहाय्यानं त्यांनी असंख्य नव्यानव्या विषयांचे प्रांत काबीज करून मराठी भाषेचं साम्राज्य कल्पनेबाहेर वाढविलं. चिपळूणकर व आगरकर यांना जर आधुनिक मराठी साहित्याचे शककर्ते म्हटलं, तर त्या न्यायानं मराठी साम्राज्याचा विस्तार करून दिल्लीचं तख्त फोडणाऱ्या सदाशिवरावभाअूंचीच अुपमा नरसिंह चिंतामण केळकर यांना द्यावी लागेल ! "
 (५४) आता गद्याप्रमाणें मी पद्य ( कविता काव्य ) वाङमयहि थोडें लिहिलें आहे. म्हणून त्याबद्दल दोन शब्द लिहितों- जगांत आजवर असा अेकहि लेखक साहित्यिक झाला नसेल की त्याने कवितेच्या कांही ओळी तरी लिहिल्या नाहीत. पण लेखक नसणारांनाहि कविता करण्याचा मोह होतो. गळ्याने गातां न येतांहि मनुष्य तोंडाने शीळ घालतो. त्याप्रमाणें