पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/८

हे पान प्रमाणित केलेले आहे.



माझा जन्मभरचा अेक
अुद्योग

 गेल्या आठवड्यांत (२४ ऑगस्ट) माझ्या वयाला सत्तर वर्षें संपून अेकाहत्तरावें वर्ष लागलें. या सत्तरांपैकीं माझीं सुमारें पन्नास वर्षें मुख्यतः वाङमयाच्या अुपासनेंत गेलीं. शेतकरी आपली निशाणी ' नांगर ' म्हणून लावतो त्याप्रमाणें मी माझी निशाणी ' लेखणी ' म्हणून अभिमानाने व यथार्थतेने लावूं शकेन.
 मात्र या अुपासनेला अेक क्रम घडला व तो क्रम असा लागतो--
( १ ) अभिलाष ( २ ) निष्ठा ( ३ ) आधार ( ४ ) भूषण  ( ५ ) करमणूक व  ( ६ ) व्यसन.
 ( १ ) विद्यार्थिदशेंतच मला वाङमयाचें प्रेम जडलें. त्या वेळीं मेकॉले किंवा गोल्डस्मिथ यांचा अेखादा चटकदार, सुंदर लेख, किंवा बाणाच्या कादंबरींतला अेखादा गोड परिच्छेद, किंवा चिपळूणकरांच्या निबंधमालेचा एखादा बहुश्रुत निबंध माझ्या वाचण्यांत आला की ' असं किंवा यासारखं आपणाला कधी लिहितां येईल काय ?' असं मनाला विचारावेंसें वाटे. मन बहुधा ' नाही ' असें उत्तर देअी. पण हव्यास सुटत नसे. आणि याविषयी अभिलाष जडला तो मात्र कायम जडला.
 ( २ ) विद्यार्थिदशा संपून संसार व अुपजीविका यांचें साधन कोणतें स्वीकारावें याचा निर्णय करण्याची वेळ आली. तेव्हा तीन मार्ग किंवा निष्ठा डोळयांपुढे होत्या. एक सरकारी न्यायखात्यांतली नोकरी, दोन वकीली, तीन लेखकाचा धंदा. या तीनहि मार्गांनी सरळ पुढे जाण्याला मी पात्र झालों होतों. ( १ ) अेल्अेल्. बी. ची परीक्षा झाल्याबरोबर मी मुनसफीकरिता अुमेदवार म्हणून मुंबअी सरकारकडे अर्ज पाठवून नोंदविला होता. आणि कोणत्याहि सार्वजनिक कार्यांत न पडतां मी वकिलीच करीत