पान:माझा जन्मभराचा एक उद्योग.pdf/९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
२]
[माझ्या जन्मभरचा
 

राहिलों असतों, तर सन १९०० च्या सुमारास मला यथाक्रम मुनसफीची सरकारी नोकरी मिळाली असती. माझ्याबरोबर किंवा अेखादें वर्ष आगमागे, अेल्अेल्. बी. झालेल्या अनेक लोकांना ही नोकरी मिळाल्याचीं अुदाहरणें म्हणून नानासाहेव चापेकर, पाटसकर, रामभाअू बाळ, मेहेंदळे, वागळे, ढेकणे, बापट अित्यादि नांवें सुचतात. यांतले अेकदोन तरी शेवटीं आठशें रुपये पगारावर स्मॉलकॉजेस कोर्टाचे जज्ज झाले. तसा मीहि झालों असतों. निदान पांचसहाशें रुपये पगाराचा फर्स्ट क्लास सबजज्ज तरी झालों असतों. नोकरीला वयाची अडचण न येण्याअितक्या अल्पवयांत मी अेल्अेल्. बी. झालों होतों. कारण मी ती परीक्षा पास झालों तेव्हां माझें वय अवघें बावीस वर्षें तीन महिने अितकेंच होतें. ( २ ) मी १८९५ सालीं वकिलीची सनद घेअून आठ महिने साताऱ्यास वकिली कामें केलीं. त्यांत मला सुमारें चारशे रुपयांची प्राप्तीहि झाली. तोच धंदा करतो तर कालांतराने साताऱ्यास अेक प्रमुख वकील होअून निदान कांही थोडीं वर्षें तरी पांच-सातशें रुपयांची दरमहिना प्राप्ति होणें शक्य होतें. ( ३ ) सातारच्या मुक्कामांत, १८९२ ते १८९४ या तीन वर्षांत, अिंग्रजी निबंध लिहून, सभांपुढे वाचून, मराठींत भाषणें करून, कविता करून, वर्तमानपत्री लेख लिहून, मी लोकांच्या दृष्टीपुढे चांगलाच आलों होतों. आणि यामुळेच अेका सातारकर स्नेह्याच्या शिफारशीवरून मला टिळकांनी केसरी-मराठ्याच्या संपादकवर्गांत दाखल करून घेतलें.
 अशा तीन मार्गांनी मला संसार संभाळतां आला असता. आता धोके असलेच तर या तीनहि मार्गांत होतेच. कारण उत्साही वृत्तीमुळे अेखाद्या सभेंत भाषण केल्याने सरकारी 'ब्लॅक लिस्टां'त नांव पडून मुनसफी न मिळती. माझा स्वभाव वकिली धंद्याला न जुळता, तर वकिलीहि कदाचित् बेताबाताचीच चालली असती. पण या दोहोंपेक्षांहि वर्तमानपत्री धंद्यांतली अनिश्चितता अनुभवाला येण्याचा संभवच तेव्हा अधिक होता. कारण तो काळ सरकारी अवकृपेचा; टिळक जहाल पक्षाचे पुढारी; व केसरी हें त्याचें मुखपत्र. शिवाय 'केसरी' पत्र तेव्हा तरी स्वतःच कर्जांत असल्यामुळें आणि 'मराठा' हें कायमचें बुडित खर्चाचें काम ठरलेलें असल्यामुळें मला पगार कितीसा मिळणार ? ती नोकरी तरी कितीशी टिकणार ?