हे पान प्रमाणित केलेले आहे.

होते. पूर्वी अनेक शतके तसा पुरुष येथे कोणीच निर्माण न झाल्यामुळे हा समाज अधोगतीला गेला होता. पाश्चात्य विद्येच्या प्रसारानंतर हे विश्वाविरुद्ध एकाकी उभे राहण्याचे धैर्य या भूमीत हळूहळू निर्माण होऊ लागले. या धैर्याची जोपासना करण्यावरच समाजाची प्रगती अवलंबून आहे.
 लोकसत्ताक राज्यपद्धतीला हा गुण व पुढील दोन निबंधांत सांगितलेले गुण अत्यंत अवश्य आहेत.
 स्वतःचे कायदे स्वतः करणे हे स्वातंत्र्य आणि अनियंत्रित सत्तेने, राजाने किंवा परकीय आक्रमकांनी आपल्यासाठी कायदे करणे हे पारतंत्र्य. पण स्वातंत्र्याकांक्षी समाजातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या समाजाने केलेले कायदे स्वतःहून, खुषीने, निष्ठेने पाळले तरच लोकसत्ता जगू शकते. आपल्या समाजात ही वृत्ती अजून निर्माणच होत नाही. आपण कायदा पाळतो तो पोलिसाच्या भीतीने, तुरुंगाच्या धाकाने. तो नसेल तर आपण कायदा पाळीत नाही, इतकेच नव्हे तर तो न पाळण्यात भूषण मानतो. याचाच अर्थ असा की आपण फौजदारनिष्ठ लोक आहो. ' आमची फौजदारनिष्ठा ' या निबंधात आपल्या या घातक प्रवृत्तीचे विवेचन केले आहे.
 ब्रिटिशपूर्व काळात हजार दीड हजार वर्षे या भूमीत विज्ञानसंशोधन लुप्तच झाले होते. इंग्रजी राज्य झाल्यापासून ते पुन्हा सुरू झाले आणि गेल्या शंभर-दीडशे वर्षांत या देशात विज्ञानाचा प्रसारही पुष्कळ झाला आहे. पण येथे अजून वैज्ञानिक मनोवृत्ती फार थोडी दिसून येते. रेखीवपणा, काटेकोरी, सूक्ष्म अभ्यास, कातीव हिशेब, अणुपरमाणूंच्या गणनेचीही दक्षता हे गुण विज्ञानाने येतात. त्यांचा अभाव हे फार मोठे वैगुण्य आपल्या समाजात आहे. फ्रान्स व जर्मनी यांच्यातील एका युद्धाच्या आधारे प्रथम या विद्यानिष्ठेची महती सांगून मग भारतातील तिच्या अभावाच्या कारणांची मीमांसा ' चौथ्या दशांशाची दक्षता ' या लेखात केली आहे.
 ' भगवान श्रीकृष्ण ' हा जरा निराळ्या प्रकारचा निबंध आहे. त्यात आपल्या समाजातील वैगुण्याचा विचार नाही. श्रीकृष्णचरित्राचे रहस्य